रत्नागिरी जिल्ह्यात एसटीचे 3,688 पैकी 3,400 कर्मचारी हजर

0

◼️ उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?

रत्नागिरी : एसटी कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाने दिलेली 22 एप्रिलची डेडलाईन शुक्रवारी समाप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 3688 कर्मचार्‍यांपैकी 3400 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तब्बल 288 कर्मचारी अद्यापही कामावर रुजू न झाल्याने 22 तारखेनंतर रुजू होणार्‍या कर्मचार्‍यांवर कोर्टाच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात 3400 कर्मचारी कामावर रुजू झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी एसटी तब्बल 5 महिने बंद होती. विलिनीकरणाच्या मुद्दयावर एसटी कर्मचारी संपावर गेले होते. संप आज मिटेल उद्या मिटेल असे वाटत असताना 5 महिने हा संप चालला. राज्य शासनाने वारंवार एसटी कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यातच उच्च न्यायालयात हा वाद गेल्यानेे न्यायालयात तारीख पे तारीख सुरू झाली. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप अधिकच लांबला. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कामावर रुजू व्हायचं नाही असा निर्णय एसटी कर्मचार्‍यांनी घेतला होता.
यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा असे स्पष्ट आदेश देत 22 एप्रिलची डेडलाईन एसटी कर्मचार्‍यांना दिली होती. तसेच 22 एप्रिलनंतर एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यात एसटी कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होऊ लागले. रत्नागिरी जिल्ह्यात 3688 एसटी कर्मचारी आहेत. त्यापैकी 3400 कर्मचारी आतापर्यंत कामावर रुजू झाले आहेत.

जिल्ह्यात 432 प्रशासकीय कर्मचारी असून त्यापैकी 413 कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर रुजू झाले आहेत. तर कार्यशाळा कर्मचारी 583 असून त्यापैकी 575 कर्मचारी तर चालक 765 असून 740 चालक कामावर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात वाहकांची संख्या 603 इतकी असून त्यापैकी 558 वाहक कामावर रूजू झाले आहेत. तर चालक तथा वाहकांची संख्या 1305 इतकी असून त्यापैकी 1103 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंतची ही आकडेवारी असून कर्मचारी संख्या वाढण्याची शक्यता आहे.

5 महिन्यांत 41 कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर 10 कर्मचारी मयत झाले आहेत. त्यामुळे 51 कर्मचार्‍यांची कमतरता एसटी प्रशासनाला भासणार आहे. त्यातच शस्त्रक्रियेसाठी काही कर्मचारी गैरहजर असून महिला वाहक प्रसुतीच्या रजेवर असल्याने त्यांची हजेरीदेखील कशापद्धतीने घ्यायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

दरम्यान, 99 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. हा दावा केला असला तरी 22 तारखेनंतर कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 23-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here