चिपळूण : रात्रीच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे चिपळूण शहर आणि लगतच्या खेर्डीमध्ये पूर आला. वाशिष्ठी आणि शिव नदीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची झोप उडाली. सकाळी दहा वाजल्यापासून पाणी शहरात शिरू लागले. सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहर जलमय झाले. परिणामी, मुंबई-गोवा आणि कराड महामार्ग ठप्प झाला. रात्रभर कोसळणार्या पावसामुळे रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून शहरात पुराचे पाणी शिरू लागले. शहरात पाणी शिरत असल्याचे लक्षात येताच नगर प्रशासन सतर्क झाले. सकाळी 11 वाजता भोंगा वाजवून नागरिकांना पुराची कल्पना देण्यात आली. शहरात ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यात आले. शहरातील सखल भागातील चिंचनाका, मार्कंडी, जुना बसस्थानक, वडनाका, भेंडीनाका, बाजारपेठ, सांस्कृतिक केंद्र आणि खेर्डी परिसरात सुमारे पाच ते दोन फूट पाणी आले होते. विशेष म्हणजे 2005च्या महापुरानंतर दुसर्यांदा बहाद्दूरशेख चौकात पुराचे पाणी शिरले. कराड मार्गावरील खेर्डी रस्त्यावरदेखील पाच फुटांपर्यंत पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे कराड मार्ग सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प होता. पाणी ओसरल्यानंतर मात्र हा रस्ता सुरू झाला. शहर बाजारपेठेत अनेक दुकानात तीन ते एक फुटापर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे दुकानातील लाकडी सामान आणि काही साहित्य, धान्य व मालाचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे जनजीवन ठप्प झाले. रविवार असल्याने शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही.
