कर्मचार्‍याच्या प्रामाणिकपणामुळे पैशाचे पाकीट परत मिळाले

0

रत्नागिरी ः जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍याच्या प्रामाणिकपणामुळे कामासाठी आलेल्या एका नागरिकाचे पैशाचे भरलेले आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकिट परत मिळाले. रमेश तुकाराम सावंत असे त्या कर्मचार्‍याचे नाव असून त्यांच्या प्रामाणिकबद्दल सहकारी कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांकडूनही वाहवा होत आहे. श्री. सावंत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर हवालदार म्हणून कामगिरी बजावत आहेत.
गेले काही दिवस जिल्हापरिषदेमध्ये विविध विकासकामांसाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्यांची मोठी गर्दी होती. जिल्हापरिषद इमारतीच्या मागील बाजूच्या दुचाकी पार्किंगजवळ एक पॉकिट रमेश सावंत यांच्या नजरेस पडले. सोमवारी (ता. 18) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. सावंत यांनी आजूबाजूला पाहिले; परंतु हरवलेली वस्तू शोधणारी व्यक्ती दिसली नाही. ओळख शोधण्यासाठी कागदपत्रे तपासलीही. त्यात फोटो आयडी सापडले. ते पॉकिट पैशांनी भरगच्च होते. सावंत यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यो स्वियसहाय्यक दिनेश सिनकर यांच्याकडे दिले आणि झाला प्रकार त्यांना सांगितला. पॉकिटमधील ओळखपत्रावरुन सिनकर यांनी संबधित व्यक्तीशी संपर्क साधत पॉकिट हरवल्याची खातरजमाही केली. पॉकिटचा मालक रत्नागिरी सोडून निघूनही गेलेला होता. पॉकिट सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधिताने रत्नागिरीतील ओळखीच्या व्यक्तीला पाठवून ते ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधिताने सावंत यांना काही पैसेही देऊ केले; परंतु त्यांनी ते न स्विकारता जिल्हापरिषदेजवळील महापुरुषाच्या मंदिरातील दानपेटीत टाकले. या दानपेटीतील पैशाचा विनियोग हा गरजुंसाठी केला जातो. श्री. सावंत यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्यांच्या दातृत्वाबद्दल जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍याकडून गौरव केला जात आहे. श्री. सावंत हे ज्येष्ठ कर्मचारी आहेत. गेली अनेक वर्षे इमानेइतबारे ते काम करत आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here