120 अश्वशक्तीवरील मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर

0

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड , ठाणे, मुंबई अशा संपूर्ण कोकणातील 120 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या सागरी मच्छीमार नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोकणातील सर्व बंदरांवरचे बंद झालेले डिझेल पंप पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली असल्याचे महाराष्ट्र मच्छीमार विकास मंचचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले.


सन 2022 -2023 या आर्थिक वर्षापासून 120 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेच्या असलेल्या 6 सिलिंडरच्या नौकांना डिझेल कोट्यात समाविष्ठ न करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यात 120 पेक्षा अधिक अश्वशक्तीच्या म्हणजे 280 अश्वशक्तीच्या  मच्छीमार नौका मोठ्या प्रमाणात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नौका मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्याने 120 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या असाव्या लागतात.
मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने फेब्रुवारी महिन्यात निर्णय घेऊन 120 अश्वशक्तीवरील नौकांचा आत्तापर्यंत मिळणारा परतावा अचानक बंद केला. एनसीडीसी अंतर्गत 70 ते 80 लाख रुपये कर्ज घेऊन मच्छीमार नौकांची बांधणी करणारे या निर्णयामुळे धास्तावले होते. या निर्णयामुळे अनुदानाचे डिझेल मिळणार्‍या मच्छीमार सहकारी संस्थाही अडचणीत आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात डिझेल कोट्यावरच्या 36 सहकारी संस्था असून त्यांचे डिझेल पंप बंदरांवर  कार्यरत होते. परंतू डिझेल कोटा बंद झाल्याने या संस्थांच्या डिझेल पंपांवर मिळणारे बाजारभावापेक्षा अधिक दराचे डिझेल कोणी घेत नव्हते. त्यामुळे हे पंप बंद करावे लागले. गेल्या दीड महिन्यांपासून हे पंप बंदच आहेत. ते आता सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.
मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने नौकांचा डिझेल परतावा बंद केल्यानंतर महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मत्स्यव्यवसाय मंत्री  अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आणि आयुक्तांना 28 फेब्रुवारी रोजी निवेदने दिली. या निवेदनांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या. त्यानंतर विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानुसार शुक्रवारी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेतली.


सागरी मच्छीमारांच्या 120 अश्वशक्तीवरील यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर होण्याबाबतचा निर्णय करण्यासाठी शुक्रवारी ही बैठक झाली. या बैठकीला मत्स्यव्यवसायचे प्रधान सचिव, आयुक्त, प्रादेशिक आयुक्त, रत्नागिरी -सिंधुदुर्ग , ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि मच्छीमार नेते उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, राजापूरच्या नेत्या हुस्नबानू खलिफे आदी उपस्थित होते. या बैठकीत 120 अश्वशक्तीवरील मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात पुढच्या आठवड्यात शासनाचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना मिळेल, असे महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here