संजय राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; नवनीत राणांचं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र

0

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. “मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत.

ते एससी-एसटीमध्ये येत नाहीत. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा,” असं नवनीत राणा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसंच 420 म्हणत संजय राऊत यांनी माझी बदनामी केली, असं राणा यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पराभूत करुन अमरावती मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासूनच शिवसेनेचे नेते संजय राऊत माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत. मी केवळ मागासवर्गीय असल्याने, चांभार जातीची आहे, त्यामुळे विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझा आणि माझ्या पतीचा उल्लेख बंटी आणि बबली असा केला. समाजात माझी बदनामी करण्याच्या इराद्याने मला 420 म्हटलं.”

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, “मी खारमधल्या माझ्या घरात असताना संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी पाठवून घेरण्यासाठी प्रवृत्त केलं. तसंच मला जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अॅम्ब्युलन्सही आणली होती. असं करताना संजय राऊत यांनी एका मागासवर्गीय महिलेला घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं. जर घराबाहेर पडले तर जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही संजय राऊतांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मला आणि माझ्या पतीला जमिनीत गाडण्याची धमकी दिली.”

“संजय राऊतांनी एका मागासवर्गीय महिलेला शिवीगाळ केली. संजय राऊतांमुळे एका शिवसैनिकाने वृत्तवाहिनीवर मला चोर म्हणून संबोधलं, कारण मी चांभार जातीतून आहे,” असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.

“मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये येत नाहीत. संजय राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (अॅट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करायला हवा. यासाठी मी तुमच्यासमोर माझी लेखी तक्रार देत आहे,” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:38 PM 27-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here