“मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही, पण…” : सुप्रिया सुळे

0

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत ठाम भूमिका घेतली असून, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मे चे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा राज्यभर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे.

यावरून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीरपणे हनुमान चालीसाचा काही भाग म्हणून दाखवला. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला हनुमान चालीसा म्हणता येत नसल्याची प्रांजळ कबुली दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी धार्मिक गोष्टींवर होत असल्याचे सांगत राजकीय परिस्थितीवर सडकून टीका केली. आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे हे सांगतानाच सुप्रिया सुळेंनी आपल्याला हनुमान चालिसा म्हणता येत नाही, याची प्रांजळ कबुली दिली.

‘मला हनुमान चालीसा म्हणता येत नाही हे प्रांजळपणे कबुल करते. मात्र, ज्यांना हनुमान चालीसा म्हणायची त्यांचा आदरही करते. त्यांनी ते जरूर म्हणावे. मात्र, इतरांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणे योग्य नाही. मला खासदार म्हणून माझ्या मतदारसंघात पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडी अशा विषयांवर कोणी प्रश्न विचारत नाही आणि महत्त्वाचे नसलेले विषय चर्चेत आणले जातात. आपल्या धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजे’, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

दरम्यान, शरद पवार १९७२ पासून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात अनेकदा गेले आणि विकास कामांना मदत केली. मात्र, त्यांनी त्याचा बाऊ केला नाही. ती पीढी कर्मयोगी होती. त्यांनी शाळा, महाविद्यालये, विमानतळ, रस्ते अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. चार मते कमी पडली तरी चालेल, पण माझे माझ्या राज्यावर, देशावर प्रेम आहे, तर मी धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीच करणार नाही. सगळेच मतांच्या राजकारणासाठी करू नये, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 27-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here