पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा; मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्देश काल दिले आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेला बरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करा, राज्यातील चाचण्यांची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या आहेत.

लसीकरण सक्तीचे करा, केंद्र शासनाकडे मागणी करणार
आपण केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रतिबंधात्मक मात्रा (प्रीकॉशनरी डोस) देताना 9 महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांना शासकीय रुग्णालयातून प्रतिबंधात्मक मात्रा देण्याबाबतचा शासन विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घेणे आवश्यक
कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. चीनमध्ये 40 कोटी जनता सध्या टाळेबंदीमध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनुकूल वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कायदा व सुव्यवस्था चोख राखा
राज्यातील सर्व महसूल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी हे प्रत्यक्ष लढणारे योद्धे असून राज्याच्या विकासाचा कणा आहेत. या यंत्रणेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने दक्ष राहण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

विभागीय सीएमओने कार्यक्षमतेने स्थानिक प्रश्न सोडवावेत
प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाने स्थानिकस्तरावर सुटणारे सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने तिथेच सुटतील याची काळजी घ्यावी व जे विषय धोरणात्मक बाबीशी संबंधित आहेत तेवढेच विषय मंत्रालयात येतील याची काळजी घ्यावी, असे आदेशही दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 28-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here