मिशन झीरोकरिता महाआवास अभियानास 5 जूनपर्यंत मुदतवाढ : हसन मुश्रीफ

0

मुंबई : गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधून पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देवून 5 लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियानाला 5 जून, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याची महत्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना जसे – रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व त्यांना पूरक पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना, इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी व गुणवत्तावाढीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 ते 1 मे, 2022 या कालावधीत महा आवास अभियान 2021-22 राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार व राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला होता.

राज्यात आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील 15 लाख 89 हजार लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 14 लाख 73 हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे व 11 लाख 19 हजार घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

महा आवास अभियान 2021-22 मध्ये 5 लाख घऱे पूर्ण करण्याचा मानस असून उर्वरीत घरकुले 5 जून पर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:09 PM 29-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here