रत्नागिरीच्या शाश्वत विकासासाठी शासन कटीबद्ध : पालकमंत्री ॲड. अनिल परब

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात पर्यावरण संतुलन व औद्योगिक विकास यातून शाश्वत विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

कवायत मैदान, रत्नागिरी येथे रविवारी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले, कोविडचे संकट सध्या नाही मात्र त्याबाबत सातत्याने काळजी घेणे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे याला सर्वांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. जिल्हयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम वेगात करण्यात आले. आतापर्यंत 21 लाख 3 हजार 266 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रिकॉशन लसीकरण 24 हजार 298 इतके आहे. सहव्याधी लोकांनी पात्र झाल्यास तिसरा डोस घेऊन सुरक्षितता वाढविणे गरजेचे आहे. सोबतच नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण जिल्हयात शुन्य कोरोना स्थिती मिळवली असली तरी इतर देशांमधील याची स्थिती बघता आपण गाफील राहून चालणार नाही. नागरिकांना सक्ती नसली तरी सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या विभागातर्फे विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयात यासाठी नियोजन निधीच्या विशेष घटक अंतर्गत १०० टक्के खर्च गेल्यावर्षी करण्यात आला. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गेल्या 3 वर्षात निसर्गाने जिल्हयात सातत्याने संकटे आणली. दोन चक्रीवादळे आणि त्यानंतर चिपळूण येथे निर्माण झालेली पूरस्थिती आपण अनुभवली विशेष बाब म्हणून चिपळूण शहरलगताच्या नद्यांमधील गाळ उपसण्यास शासनाने तातडीने मान्यता दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिकरित्या याकडे लक्ष दिले. या ठिकाणी मोठया प्रमाणात गाळ उपसा झाला असून येत्या काळात असे संकट पुन्हा येणार नाही अशी आशा बाळगू या, असे ते म्हणाले. आपल्या जिल्हयात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. हापूस आंबा यंदा मोठया प्रमाणात विदेशात आपण पोहचवू शकलो आहोत. आपण काजूप्रक्रिया करणारे उद्योग कसे वाढतील यावरही काम करीत आहोत. बचतगटांच्या माध्यमातून बांबू आणि नारळासह मसाल्याची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलशक्ती अभियानातून जिल्हयात पाणीसाठयांचे पुनरुज्जीवन करण्यास गती देण्यात आली आहे. यामुळे जिल्हयातील भूजल फेरभरण होणार आहे. वृक्ष लागवडीची जोड देऊन मातीची धूप होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. हरघर जल अर्थात घरोघरी नळाने पाणी पुरवठा करण्याचे उद्दीष्ट आपाणास पूर्ण करायचे आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हयातील 1534 गावात 1443 पाणीपुरवठा योजना सध्या प्रगतीपथावर आहे असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करुन सर्वांचे उत्पन्न वाढविण्यास शासन प्राधान्य देत आहे. यासाठी शेतकरी आणि पशूपालक यांना किसान क्रेडीट कार्डाच्या माध्यमातून 1 लाख 60 हजारांपर्यंत पतपुरवठा करण्यात येतो याचाही लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

जिल्हा पोलीस दलातील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा यावेळी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन निधीतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकरिता 16 दुचाकी व 08 चारचाकी देण्यात आलेल्या वाहनांपैकी आज 05 स्कॉर्पीओ वाहनांचे लोकार्पण तसेच पोलीस नियंत्रण कक्ष इमारत बांधकामाचे भुमीपूजनही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 02-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here