शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

नाशिक : शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल होऊ शकत नाही, असे असले तरी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार.
तसेच संपूर्ण विश्वात जो युगानुयुगे अन्नदाता म्हणून आपले कर्तव्य निभावतोय त्यांचा सन्मान म्हणजे शासनाचा खऱ्या अर्थाने बहुमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते सोमवारी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे. त्यामुळे देशातील अन्नदाता शेतकरी राजाच हा देशाचे खरे वैभव आहे. या वैभवाचं मोल एखाद्या पुरस्काराच्या रकमेतून होवू शकत नाही याची आपणा सर्वांना जाणीव आहे, या पुरस्कारांची रचना दशकभरापूर्वीची आहे, आता त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी कृषी विभागास करतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोविड कालखंडातून जग अजूनही बाहेर पडलेले नाही. परंतु कितीही संकटे आली आणि गेली, मात्र आमचा शेतकरी राजा मात्र ताठ कण्याने उभा होता, तो थांबला नाही, कोरोनात कोलमडणारा संपूर्ण विश्वाचा डोलारा या अन्नदात्याने आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या सरकारनेही त्याला भक्कम पाठबळ दिले. शहरी लोकांसाठी शेतकरी जीवनाची कल्पना करणे अवघड आहे, गेल्या दोन वर्षांच्या संकटकाळात संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम काम करत होते. शेतकरी मात्र वर्क फ्रॉम होम काम करत असता तर? या प्रश्नांची कल्पनाच आपल्याला जेव्हा असह्य करून सोडते, तेव्हा अपोआपच अन्नदात्याचे महत्व अधोरेखित होते.

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये अहोरात्र शेतात संपूर्ण कुटुंबासह जर कुणी अनलॉक राहिला असेल तर तो आमचा अन्नदाता शेतकरी राजा होता. त्यानेच प्रत्येकाच्या घरांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला, फळे पोहचवली आहेत. त्यामुळे जेव्हा संकटं उभी ठाकतात तेव्हा आमचा शेतकरी न डगमगता संकटांशी दोन हात करतो, जिंकतो. मी जेव्हा केव्हा राज्यात दौऱ्यावर जातो तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना आवर्जून भेटत असतो. त्यात मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी मला दिसतात. आजीपासून नातीपर्यंतची पिढी शेतात काम करतांना दिसते. आपण सर्वजण भविष्याचे नियोजन करत असतो. पण शेतात काम करणाऱ्या आजीला नेहमीच नातीच्या रात्रीच्या जेवणाची भ्रांत असते. अशा परिस्थितीतही पद्मश्री राहीबाई पोपेरे सारख्या काही महिला शेतकरी चाकोरीबद्ध शेतीची जीवनशैली बाजुला सारून बीज बॅंकांची संकल्पना आत्मसात करतात. नवनवे प्रयोग करतात, तेव्हा कौतुकाची संकल्पनाही त्यांच्या या कार्यासमोर तोकडी वाटायला लागते, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले, शेतीत नवनवे प्रयोग करत असताना आपण परदेशी वाणावर अवलंबून होतो. थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला मागे वळून पाहताना ‘जुनं तेच सोनं’ म्हणायची वेळ आलीय. असे म्हणतात शेती ही शेतकऱ्यालाच समजते, पण आम्हाला त्यांचे अश्रु नक्कीच समजतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्त केले. त्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले.

आता हळूहळू अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महामार्गांच्या विस्तारीकरणातून शेतीचे अर्थकारण थेट पाणंद रस्त्यांपर्यंत विकसित करण्याचा मानस आहे. ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना आम्ही बाजार संशोधनातून अधिक सक्षम करणार आहोत. शेतकरी सुखात रहायला हवा, त्याचे जगणे सुसह्य करणे हे शासन म्हणून आमचे कर्तव्य तर आहेच, तसेच त्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:38 PM 03-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here