कांदळवन संरक्षण, संवर्धन प्रकल्पातून 1,010 लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त

0

रत्नागिरी : वनविभाग आणि कांदळवन कक्ष यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून गेल्या पाच-सहा वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पात 126 गटांच्या 1010 लाभार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 40 हेक्टरवर कांदळवन वृक्षांची लागवडीबरोबरच संवर्धनातही वन विभागाने आघाडी घेतली आहे.

कोकण किनारपट्टीला कांदळवनाच्या संरक्षणाबरोबर संवर्धनाची राजधानी मानली जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण किनारपट्टी आहे. हे सर्व किनारे जैवविविधतेने नटलेले आहेत. यामध्ये लहान मोठे वृक्ष, झुडपे, पक्षी, प्राणी, कीटक या जैवसमृध्दतेबरोबरच कांदळवने अर्थात खारफुटीची विस्तीर्ण जंगले आहेत. परंतु याच कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धनाचा मुद्दा काही वर्षांपूर्वी पुढे आला होता.

ही कांदळवने टिकविण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले. शासनाच्या कांदळवन कक्ष, वनविभाग यांना स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच कांदळवन संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत कांदळवन परिसरातील महिला बचत गटांसाठी प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली. कांदळवन क्षेत्रात महिला बचत गटांना खेकडा पालन, कालवे पालन, शिणाने पालन, शोभिवंत मत्स्यपालन असे प्रकल्प 90 टक्के अनुदानावर सुरू केले.
या प्रकल्पांतर्गत महिला बचतगटांच्या महिलांना केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश येथे नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांपैकी काहींनी खेकडा पालन, काही गटांनी कालवे, शिंपले पालन सुरू केले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 110 महिला बचत गट हे प्रकल्प सुरू केले असून त्यातून लाखो रूपयांची उलाढाल दरवर्षी होते. उत्पादीत मत्स्य उत्पादनाला स्थानिक आणि गोवा बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

या प्रकल्पांतर्गत 47 कांदळवन सहव्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून कांदळवन संरक्षित करताना त्यांचे संवर्धन करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. खारफुटीच्या एकूण 20 प्रजाती येथे आढळतात. एक एकर कांदळवनातून दरवर्षी साडेसात हजार टन इतका पालापाचोळा निर्माण होतो. त्याचा फायदा मत्स्य उत्पादन वाढीसाठी होतो. याशिवाय खारेपाणी, वादळे रोखण्यासाठी कांदळवनाचा उपयोग होतो. किनारी भागाची धूप थांबविण्यासाठी कांदळवनाचा मोठा फायदा होतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 03-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here