…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार; पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं..

0

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांचा विषय काही एक दिवसाचा नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी रोखठोक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेकडून आज राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

“मला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत ११४० मशिदी आहेत आणि त्यापैकी आज १३५ मशिदींवर पहाटे अजान लावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाचा भंग या मशिदींकडून झालेला आहे. मग माझं राज्य सरकारला विचारणा आहे की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पकडत आहात. मग या मशिदींवर कारवाई करणार आहात की नाही?”, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

“मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाचं कोणतही श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे. आज अनेक मशिदींच्या मौलवींनी भोंग्यांवर अजान घेतली नाही. अशा सर्व मौलवींचे मी आभार मानतो. पण हा आजच्या एका दिवसाचा प्रश्न नाही. जोपर्यंत लाऊडस्पीकरवर अजान पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत हनुमान चालीसाचं आंदोलन सुरूच राहील”, असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईचे पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आल्याची माहिती यावेळी राज ठाकरे यांनी दिली. “विश्वास नांगरे पाटील यांनी काल फोन करुन मौलवींशी बोलणं झालं असून ते नियमानुसार अजान करतील असं आश्वासन मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही आज मुंबईत १३५ मशिदींमध्ये पहाटेची अजान झाली आहे. नांगरे पाटील यांनी मला मशिदींनी मागितलेल्या परवानगीची माहिती दिली. पण मुळात मुंबईतील मशिदी अधिकृत तरी आहेत का? अनधिकृत मशिदींवरील भोंगे अनधिकृतच आहेत. मग त्यांना अधिकृत परवागनी कशी काय देता तुम्ही?”, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

“मशिदीवरील भोंग्यांवरुन दिली जाणारी अजान हा काय केवळ पहाटेच्या अजानचा प्रश्न नाही. दिवसभरातील विविध वेळांना बांग दिली जाते. याचा लोकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हायला हवा हीच अपेक्षा आहे. विषय काही फक्त मशिदींवरचा नाही. मंदिरांवरही अनधिकृत भोंगे असतील आणि त्याचा लोकांना त्रास होतील तर तेही उतरवले गेले पाहिजेत. विशिष्ट डेसिबलची मर्यादा पाळण्याचं आवाहन करत तुम्ही परवानगी देत आहात. मग काय पोलिसांनी रोज मशिदींबाहेर डेसिबल मोजत बसायचे का? एवढंच काम त्यांना आहे का? त्यामुळे मशिदीवरील भोंगे कायमस्वरुपी उतरवले गेले पाहिजेत. तसं नाही झालं तर आमची लोकं हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणारच”, असं राज ठाकरे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:16 PM 04-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here