रत्नागिरी : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाला ९ ऑगस्ट रोजीचा मुहूर्त मिळाला आहे. यामुळे उमेदवारांना आता दिलासा मिळणार आहे, शिक्षक भरती पारदर्शकपणे राबविण्यासाठी गेल्या वर्षी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. १२ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची घोषणाही करण्यात आली होती, यासाठी १ लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. भरती प्रक्रियेबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका, आरक्षणातील अनेकदा झालेले बदल, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी या विविध कारणांमुळे भरतीची प्रक्रिया सतत लांबणीवरच पडली होती. निवड यादी त्वरीत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उमेदवारांनी दिला होता. त्याची गांभीर्याने दखल शासनाकडून घेण्यात आली आहे, निवड यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता उमेदवारांना लागली होती. ही उत्सुकता आता संपली आहे. पोर्टलवर उमेवारांची यादी जाहीर करण्याबाबतच्या सूचना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व काही खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी मुलाखती न घेता थेट निवड यादीच पुढच्या रिपोर्ट या मेनू अंतर्गत सिलेक्शन स्टेट्समध्ये माहिती मिळणार आहे. काही खासगी संस्थामध्ये मुलाखतीसह प्राधान्यक्रम नोंदविलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीसाठीची निवड सूची येत्या १६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘एनआयसी’ मार्फत निवड यादी तयार करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
