ब्राह्मणांनी मुलांना शास्त्रीयदृष्ट्या परंपरा शिकवावी : चित्रा गोस्वामी

0

रत्नागिरी : ब्राह्मणांवर अनेकदा हल्ले झाले, मोठी संकटे आली तरीही ब्राह्मण डगमगला नाही. हरला नाही, आंदोलन केले नाही. मोर्चा काढला नाही. आरक्षणही मागितले नाही. ब्राह्मणांची संख्या कमी असली तरी आम्ही दुसऱ्यासमोर हात पसरले नाहीत, सामंजस्याने परिस्थिती स्वीकारतो, सांभाळली, समाजालाही पुढे घेऊन जातो. आम्ही अटकेपार झेंडे लावले. पण पाठीत खंजीर खुपसणारेही आहेत. ब्राह्मण पालकांनी आपल्या मुलामुलींना रूढी परंपरा, सण, उत्सव, पूजापाठ शास्त्रीयदृष्ट्या शिकवले तरच ते मुले पुढे नेतील, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात दि. ३ मे रोजी झालेल्या विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, चंद्रकांत हळबे, पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोस्वामी म्हणाल्या की, असे कुठलेच क्षेत्र नाही की ते ब्राह्मणांनी पादाक्रांत केलेले नाही. आपल्याला आपला गौरवशाली इतिहास माहिती आहे. परंतु आज ब्राह्मण मुली, महिलांची फसवणूक केली जात आहे. ब्राह्मणांमधील पोटजातींच्या भेदामुळे आपली शक्ती विखुरली गेली आहे. बऱ्याचदा अहंकार पुढे येत असतो. तो नष्ट केला पाहिजे. भारतीय संस्कृती आणि साने गुरुजींच्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी प्रबोधन केले. बुद्धी, शक्तीचा स्वाभिमान असावा, आपण जमिनीवर राहूनच काम करावे. अहंकार नसावा, हे गोष्टीतून सांगितले.

याप्रसंगी आरोग्यविषयक विविधांगी पुस्तक लेखनाबद्दल डॉ. शरद प्रभुदेसाई, शतकवीर रक्तदाते मोरेश्वर जोशी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराबद्दल प्रमोद कोनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या तज्ज्ञ संचालिका सीए मुग्धा करंबेळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पाचवी, आठवी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी आणि पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश मिळवणाऱ्या मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.मुख्य अतिथी व सत्कारमूर्तींचा परिचय प्रिया लोवलेकर, प्रतिभा प्रभुदेसाई, चंद्रकांत हळबे, मानस देसाई, उदय काजरेकर यांनी करून दिला. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी संघाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. याप्रसंगी सत्कारमूर्तींनी संघाने कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. प्रभुदेसाई म्हणाले की, मी पुरस्काराचे श्रेय माझ्या वाचनाला श्रेय देतो. मला वाचनाची आवड तेविसाव्या वर्षी लागली. इंटर्नशिप सुरू केली. पहिली कादंबरी वाचायला तीन महिने लागले. त्यानंतर मनोरंजन कळले व वाचनाचे वेड लागले. मी भरपूर विविधांगी वाचन करतो. डॉ. रवी बापट यांचे पेशंटचे किस्से पुस्तक वाचून मीसुद्धा पहिले पुस्तक लिहिले व आत्मविश्वास वाढला, त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली.

प्रमोद कोनकर म्हणाले, पत्रकारितेचा गाभा हरवून चालणार नाही. पत्रकारितेमधून जनतेचे प्रबोधन करण्याची गरज आहे. सोशल मीडियामुळे वृत्तपत्रे, साप्ताहिकांचे दिवस संपले अशी चर्चा होते. पण वृत्तपत्रांना चांगले दिवस आहेत. परदेशांतही २५ टक्के वृत्तपत्रे वाढली आहेत. विश्वासार्ह, खात्रीशीर बातमी, लेखांसाठी वृत्तपत्रे वाचली जातात. लोकमान्य टिळकांच्या काळात साक्षरतेचे प्रमाण कमी असूनही सामुदायिकरीत्या केसरीचे वाचन करून स्वातंत्र्य चळवळ रुजविली गेली. आज साक्षरतेचे प्रमाण प्रचंड असूनही वृत्तपत्रीय वाचनाकडे दुर्लक्ष केले जाते. सोशल मीडियाच्या बातम्यांवर विश्वास ठेवला जातो. पण योग्य काय आणि अयोग्य काय, याचा विचार सुशिक्षित समाजानेही करायला हवा.सीए करंबेळकर म्हणाल्या की, मी कंपनी सेक्रेटरी, सीएचे शिक्षण रत्नागिरीत राहूनच पूर्ण करू शकले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी विद्यार्थिदशेत चांगले निर्णय घ्यावेत. आताच ज्यांचा सत्कार झाला, त्यांच्यासह रत्नागिरीत मार्गदर्शन करायला अनेक मान्यवर व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांनी वाचन करावे. स्वतःला घडवावे.

मोरेश्वर जोशी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, अठराव्या वर्षी रक्तदान दिले. मी किती वेळा दान केले ते मोजले नव्हते पण पन्नास वेळा रक्तदान झाल्यावर रक्तपेढीतल्या व्यक्तींना सांगितले. तिथले डॉक्टर, सिस्टर्सचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाले. आई-वडिल, जोशी कुटुंबियांच्या प्रेरणा, सहकार्यामुळे शंभर वेळा रक्तदान केले. आता माझ्यासारखेच १०० रक्तदाते निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन आणि भगवान परशुराम जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अक्षय्य तृतीयेनिमित्त कलशपूजन व त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रमाद्वारे वसंतोत्सव साजरा करण्यात आला. सरस्वतीवंदना जुई डिंगणकर हिने सादर केली. या वेळी कार्यक्रमासाठी मदत करणारे स्वयंसेवक, वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सौ. श्रावणी सरदेसाई यांनी केले. सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी आभार मानले. पसायदान आणि वंदे मातरम् जुई डिंगणकर, ऋजुला हळबे, ऋग्वेदा हळबे, रुद्रांश लोवलेकर यांनी सादर केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 05-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here