विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका

0

पंढरपूर : भोंग्याच्या विषयावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या गोंधळाचा फटका शिर्डीच्या साई मंदिरापाठोपाठ आता थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील बसणार आहे.

मंदिरातून होणारी काकडा आरती आणि धुपारती आता स्पीकरवरुन लावता येणार नाही. विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरु केली आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेचं राज्यभर आंदोलन सुरु आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिरात स्पीकर वापरला जाईल, असं व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं. याबाबत भाविकांच्या भावना मात्र अतिशय टोकाच्या असून कोणत्याही परिस्थितीत विठ्ठल मंदिरावरील स्पीकर बंद करु नये, अशी भूमिका विठ्ठल भक्त घेत आहेत. सर्वच धर्माला सारखा नियम असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणताच मंदिर आणि मशिद या कशावरही भोंगे काढू नयेत फक्त आवाजाची अट पालन करण्याची सक्ती करावी. मात्र मंदिर आणि मशिदीवरील भोंगे तसेच ठेवण्याचा आग्रह विठ्ठल भक्तांचा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रोज पहाटे काकडा आरतीच्या वेळी आणि सायंकाळी धुपारातीच्यावेळी विठ्ठल मंदिरातील स्पीकरचा वापर केला जात असतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेतच स्पीकर लावण्याची परवानगी असल्याने काकडा आरतीच्या वेळी विठ्ठल मंदिरालाही स्पीकर लावता येणार नसून केवळ सायंकाळी होणाऱ्या धुपारातीच्या वेळी स्पीकर लावता येईल.

आता विठ्ठल मंदिरानेही पोलिसांकडे परवानगी मागण्याची तयारी केली असताना पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेक मशिद आणि मंदिराकडून पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी काढलेल्या भोंग्याच्या मुद्द्याचा सर्वात जास्त फटका हा राज्यातील हिंदू मंदिरे आणि धार्मिक कार्यांना बसणार आहे. आता या सर्व प्रश्नावर शासन काय भूमिका घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 05-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here