आरे-वारे येथील ‘ओशन फ्लाय झिपलाईन’चे 8 मे रोजी ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील निसर्गसुंदर अशा आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागले आहेत. परंतु पर्यटक तिथे जास्त वेळ घालवत नाही नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन रत्नागिरी मध्ये येणा-या पर्यटकांसाठी तसेच रत्नागिरीतील साहस प्रेमींसाठी आरे-वारे समुद्रावरून झिपलाईन हा नवीन साहसी क्रीडा प्रकार सुरू होत आहे.

या प्रकल्पासाठी स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच आरे-वारे स्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या झिपलाईन प्रोजेक्टमुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृद्धीस हातभार तर लागेलच, त्याचबरोबर सध्या साहसी पर्यटनस्थळ म्हणून होत असलेल्या रत्नागिरीच्या ओळखीमध्ये नक्कीच भर पडेल.

अशा या अतिशय महत्त्वाच्या कायमस्वरूपी झिपलाईन चे रविवार, दिनांक ८ मे २०२२ रोजी संध्या ०४ वाजता ना. श्री. उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी श्री. विकासचंद्र रस्तोगी (प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट), डॉ. बी. एन. पाटील (जिल्हाधिकारी, रत्नागिरी) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रावरील या पाहिल्याच झिपलाईनमुळे सदर पर्यटकाला १४०० फूट लांबपर्यंत, समुद्रावरून आकाशामध्ये पक्षाप्रमाणे विहार करताना निसर्गाचे अवर्णनीय रूप, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि बेभान वायाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. याचा लाभ घेणारे पर्यटक नक्कीच खुश होवून आपआपल्या मित्रपरिवारामध्ये झिपलाईनची पर्यायाने रत्नागिरीची प्रसिद्धी करतील.

या झिपलाईन प्रोजेक्टमुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृद्धीबरोबरच स्थानिक लोकांच्या बीच वरील उद्योगधंद्यांमध्ये वाढ होईल. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांपासून ते रिक्षावाल्या पर्यंत पर्यटन क्षेत्राशी निगडीत सगळ्यांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.

सदरची झिपलाईन राईड ही माफक दरात असून पर्यटकांसाठी पुर्णपणे सुरक्षित असणार आहे . यामध्ये उभारणीतील सर्व तांत्रिक गोष्टींपासून ते सर्व उपकरणांपर्यंत इंटरनॅशनल स्टैंडर्डचा वापर करण्यात आलेला आहे. या झिपलाईन मध्ये वापरण्यात आलेली सगळी उपकरणे ही UIAA मानांकित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या साहसी पर्यटन धोरणांतर्गत शासनाने नेमून दिलेल्या गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करून सदर झिपलाईनची उभारणी करण्यात आलेली आहे.
या झिपलाईनसाठी प्रोफेशनल सर्टिफाइड प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना या क्षेत्रातील कामाचा भरपूर अनुभव आहे. तसेच मदतनीस म्हणून स्थानिक तरुणांना रोजगारची संधी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रमाणित प्रथमोपचारक आणि प्रथमोपचाराच्या साधनांची पूर्तता केलेली आहे.

सदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईस्थित ‘मलय अॅडव्हेंचर्स’ चे प्रमुख श्री. मेहबूब मुजावर यांचे तांत्रिक मार्गदर्शन व मोलाचा सहभाग लाभला, तसेच ‘रत्नदुर्ग माउंटेनिअर्स’ संस्थेच्या सदस्यांनी वेळोवेळी सर्वतोपरी मदत केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:45 PM 05-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here