कुंभार्ली घाटात आढळला मृतदेह; चौघांना अटक

0

रत्नागिरी : कुंभार्ली घाटातील दरीमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचा खून मांडूळ सापाच्या तस्करीतून झाल्याचे उघड झाले आहे. हा मृतदेह उदयभान रामप्रसाद पाल (रा. घाटकोपर, मुंबई) याचा असल्याचे पोलिस तपासांत उघड झाले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. याबाबत शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 25 जून रोजी कुंभार्ली घाटातील खोल दरीत अज्ञाताचा मृतदेह आढळून आला होता. अनेक दिवस त्यासंदर्भात पोलिस तपास करीत होते. मात्र, मृतदेहाची ओळख पटली नव्हती. अखेर उदयभान पाल यांच्या पत्नीने मुंबई येथे आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.  त्यानंतर शिरगाव पोलिस ठाण्यात मृताच्या कपड्यांवरून ही ओळख पटवण्यात यश आले. उदयभान पाल यांचा खून मांडूळ सापाच्या तस्करीतून झाल्याचे उघड झाले असून यात व्यवहारातून दि.18 जून रोजी कराड येथील कोयनानगर वसाहतीमध्ये धारदार शस्त्राने उदयभान यांचा खून करण्यात आला. दुसर्‍या दिवशी दि.19 रोजी सकाळी 10 वा. कुंभार्ली घाटातील खोल दरीत त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार सुमारे दोन महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी प्रदीप शंकर सुर्वे, अक्षय दीपक अवघडे, सुरज बाळू सोनावणे, विनोद शिद्रूड (सर्व रा.कराड) या चौघांना अटक करण्यात आली असून कलीम शब्बीर अहमद कुरेशी (रा.गोवंडी-मुंबई) हा फरार आहे. अधिक तपास शिरगावचे सहा.पोलिस निरीक्षक बडेसाब नायकवडी करीत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here