राज ठाकरे यांना सरकार घाबरतं, म्हणूनच अटींचं उल्लंघन करुनही त्यांच्यावर कारवाई नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

0

मुंबई : मनसे नेते राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरतं, त्यामुळेच 1 मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.

राज्य सरकार राणा दांपत्यावर कारवाई करते पण राज ठाकरेंवर कारवाई करायला का घाबरते असा सवालही त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, “औरंगाबादेत 12 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केलं. त्यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. राणा दांपत्यांवर कारवाई झाली ते योग्य झालं पण राज ठाकरेंवर कारवाई का केली नाही? माझ्या मनात हा प्रश्न आहे की राज ठाकरेला मविआ का घाबरतंय का? राज ठाकरेंच्या कडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी. ती होत नाही, सरकारने ही प्रक्रिया जलद गतीने करावी आणि ठोस कारवाई करावी.”

संजय निरुपम राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, राज ठाकरे रंग बदलतात, झेंडा बदलतात, यामागे भाजपचा हात आहे. राज ठाकरे अयोध्याला जात आहेत, त्यामागे भाजपचा हात आहे. भाजपने त्यांचा अजेंडा राज ठाकरेंमार्फत राबवण्यास सुरु केली आहे. भाजप आणि मनसे यांची हातमळवणी झाली आहे. हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याआधी, उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक करण्याआधी राज ठाकरेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहीजे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं, त्यांच्या मनाला ठेच पोहोचवली आहे, त्यांनी त्याबद्दल लोकांची माफी मागितली पाहिजे.

आयोध्याला कुणीही जाऊ शकतो, राज यांनीही जावं पण त्यांना याचा फायदा होईल असं वाटत नाही असंही संजय निरुपम म्हणाले.

दरम्यान, संजय निरुपम यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने हात झटकले आहेत. संजय निरुपम यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:06 PM 07-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here