नवनीत राणांच्या एमआयआर कक्षातील फोटोसेशनमुळे लीलावती रुग्णालय अडचणीत

0

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील फोटोसेशन रुग्णालय प्रशासनाला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, आता या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते कमालीच आक्रमक झाले आहेत.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात जात तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. एखादा रुग्ण एमआयआर कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यामुळे उद्या रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

यावेळी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एमआयआर कक्षात मोबाईल नेणे, ही तुम्हाला गंभीर बाब वाटत नाही का? तुम्हाला कोणी जाब विचारण्यापूर्वी तुम्ही या सगळ्याची विभागीय चौकशी का केली नाही?. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही व्हीआयपी व्यक्ती असतो, रुग्णालयाचे नियम सगळ्यांना सारखे असतात. रुग्णालयांचा कारभार हा चॅरिटी कमिशनच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे तुमचे रुग्णालय खासगी असले तरी त्याठिकाणी सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. आम्ही असले प्रकार रुग्णालयात खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावले.

तर किशोरी पेडणेकर यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे रुग्णालयाचे नाव खराब होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही किती गांभीर्याने घेता हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही रेडिऑलॉजी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना आमच्यासमोर हजर करा. तुमच्या रुग्णालयात येऊन कोणीही काही करते आणि तु्म्हाला काहीही पडलेले नाही. नवनीत राणा यांना एमआयआर कक्षात फोटोसेशन करण्यापासून कोणी रोखले कसे नाही, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला. यावर रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले. ही चूक गंभीर आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण नवनीत राणा यांचा फोटो काढण्यात आला तेव्हा एमआयआर मशीन सुरु नव्हती, असे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 09-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here