कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे पुढील 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यादरम्यान रिटर्न तिकीटचे पैसे, बंद गाड्यांबाबत योग्य ती माहिती न मिळणे, कर्मचार्यांकडून असमाधानकारक उत्तरे यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकावर काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारत हंगामा केला. त्यामुळे अखेर कुडाळ पोलिसांना रेल्वे स्थानकात पाचारण करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात स्टेशनवर थांबलेल्या गाड्या मागे फिरवण्यात आल्या. कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने सर्वच गाड्या बंद करण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. कुडाळ रेल्वे स्थानकात आलेले प्रवाशी मागे फिरले. मात्र रेल्वे स्थानकावर डबलडेकर थांबविण्यात आली होती. तर जनशताब्दी झाराप रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. यातील डबलडेकर ओरोसवरुन माघारी परतवण्यात आली. तर जनशताब्दी एक्स्प्रेस कुडाळ येथे आणून मागे वळवण्यात आली. या दरम्यान घरी जाणार्या प्रवाशांना त्वरित तिकीट कॅन्सलचे पैसे मिळत नव्हते. तर झाराप सारख्या स्टेशनवरील काऊंटरवर कॅन्सल तिकीटना देण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. सर्वच गाड्या रद्द झाल्याने व सर्वच प्रवाशांचे तिकीट रद्द झाल्याने स्टेशनमध्ये परत देण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेस, डबलडेकर या गाड्या मडगाववरुन सुटण्यापूर्वीच रेल्वे मार्ग बंद झाल्याने या गाड्या सोडल्याच का? तसेच कर्मचारी वर्गाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने यासारख्या विविध कारणावरून रेल्वे प्रवाशांनी स्टेशन मास्तर श्री. सामंत यांना धारेवर धरत जाब विचारला. अखेर स्टेशन मास्तर यांनी कुडाळ पोलिसात फोन करत पोलिसांना पाचारण केले. पोलिस स्टेशनला हजर होताच काही वेळासाठी हा वाद मिटला. मात्र यानंतर झाराप रेल्वे स्थानकात थांबवलेली जनशताब्दी एक्स्प्रेस कुडाळ रेल्वे स्थानकावर आल्यावर त्यामधील प्रवाशांनी गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने जादा पोलिस दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर दोन अधिकारी व पाच कर्मचारी रेल्वे स्थानकात दाखल झाले. यानंतर जनशताब्दी एक्स्प्रेस दाखल होताच या प्रवाशांनीही मार्ग बंद आहे हे माहीत असतानाही का सोडली? याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच योग्य ती माहिती का दिली जात नाही याबाबतही विचारणा करण्यात आली. यानंतर त्यातील प्रवाशांना ही गाडी परत मागे जात असून आपापल्या स्टेशनवरून तिकीटचे पैसे घेण्यासाठी आवाहन ध्वनीक्षेपकावरुन करण्यात आले. यानंतर 6 वाजता ही गाडी मागे वळवण्यात आल्यानंतर येथील वातावरण काहीसे शांत झाले. यादरम्यान कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी रेल्वे स्थानकात हजर होत वस्तुस्थितीचा आढावा घेतला.
