संभाजीराजे छत्रपतींना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यापासून रोखल्यानं वाद

0

तुळजापूर : भाजपचे खासदार संभाजीराजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असता दौऱ्यावेळी कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात गेले असता गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकारमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर ते नेहमी थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र 9 मे रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं.

याबाबत जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन लावून छत्रपती संभाजीराजे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सुनावले. परंतु प्रशासनाला काहीही खेदजनक वाटले नाहीय असं म्हणत या प्रकरणी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधित मंदिर तहसीलदार व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी निलंबन करावे अन्यथा राज्यभर जनआंदोलन उभारू अशी उद्विग्न भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

छत्रपती संभाजीराजे तुळजाभवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात. तेव्हा ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते.

युवराज संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले. मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो.

भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे. पूर्वी हा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील कधीही येथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम लादले नाहीत.

मात्र, यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे. निजामाने आणि इंग्रजानी देखील या परंपरेमध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही.

तुळजाई नगरीत देवीच्या दारात वाद नकोत म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी जरी शांततेने हे प्रकरण हाताळले असले तरी सरकारने समस्त महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचा हा अपमान केला आहे. सरकारने आणि प्रशासनाने समस्त महाराष्ट्रवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल माफी मागावी आणि हा प्रकार पुन्हा घडू नये याची हमी द्यावी अशी उद्विग्न भावना यावेळी पत्रकार परिषदेत मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 11-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here