”तेव्हा माझे वजन १२८ किलो होते, आता..”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

0

मुंबई : माझे वजन सध्या १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा १२८ किलो होते. त्यात लाजायचे काय, असा प्रश्न करतानाच तिथे एकही शिवसैनिक नव्हता म्हटल्यावर तुम्हाला इतकी का मिरची लागली?, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांचे वजन आणि वयावरून खिल्ली उडवली होती. त्यावर, मी बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना मला सांगायचे आहे बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन १२८ किलो होते आता १०२ आहे. पण, मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयची भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असे ते म्हणाले.

१९९२ साली फेब्रुवारीमध्ये मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो. डिसेंबरमध्ये नगरसेवक, ॲडव्होकेट फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. मुख्यमंत्री सहलीला चला, सहलीला चला म्हणत होते. आम्ही तर ‘लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनाऐंगे, अशा घोषणा देत आंदोलनाला गेलो. बदायूच्या तुरुंगात अनेक दिवस काढले. शिवसैनिकांची वाट पाहत राहिलो. पण हे आले नाहीत, असा टोला लगावला.

संसार केला, संपत्ती घेऊन पळालात
उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी प्रेमाची वगैरे भाषा केली. पण, तुम्ही पाच वर्षे सत्तेत आमच्या बरोबर संसार केला आणि आमची संपत्ती घेऊन पळून जाऊन लग्न केले. किमान अधिकृत घटस्फोट तरी घ्यायचा होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘यांचे’ वर्क फ्रॉम जेल
पहाटेच्या शपथविधी यशस्वी झाला नाही याचा मला आनंदच आहे. मात्र, तो यशस्वी झाला असता तरी माझ्या मंत्रिमंडळात सचिन वाझे नसता.. अनिल देशमुख आणि दाऊदचा साथीदार नसता. तशी वेळ आली असती तर सत्तेला लाथ मारली असती. पण, यांचे मात्र सध्या वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, असे ते म्हणाले.

ओ खैरे… व्हा आता बहिरे
‘मी म्हणतो ना संभाजीनगर असे म्हणून औरंगाबादचे संभाजीनगर होत नसते, असा टोला उद्धव ठाकरेंना हाणून फडणवीस म्हणाले की, मॅडम चिंता करू नका. आमचा पाठिंबा काढू नका आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो, असे उद्धव ठाकरे यांनी सोनियाजींना सांगून टाकले आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उद्देशून फडणवीस म्हणाले, ओ खैरे… व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायम झाला खसरा, भाजप सरकार येत नाही तोवर, आता संभाजीनगर विसरा.

उद्धव यांचे भाषण तर सोनिया गांधींना खूश करण्यासाठी…
उद्धव ठाकरेंचे भाषण सोनियाजींना खूश करण्यासाठीच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस बोलते तीच भाषा ते बोलले. मी हिंदुत्व हिंदुत्व करतोय पण बघा संघाला शिव्या दिल्या. मी तुमचाच आहे हे सोनियाजींना दाखवण्याठी ते बोलले, अशी टीका फडणवीस यांनी केली. आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक होते याची सरकार दरबारी नोंद आहे. जंगल सत्याग्रहातही ते होते, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. स्वातंत्र्याच्या लढ्यात संघ कुठे होता, असा सवाल उद्धव यांनी शनिवारी सभेत केला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here