काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले…

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केल्याने काँग्रेस चांगलीच नाराज झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघडपणे यावर भाष्य करत राष्ट्रवादीवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. यातच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, या प्रश्नावर नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनले होते त्याचा उल्लंघन होत आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून, आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही. काँग्रेसला देशाची चिंता आहे. सध्या देशात राज्यघटना तसेच लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ५० टक्के तरुणांना संधी देऊ, एक परिवार एक तिकीट याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून होणार आहे. येत्या २ ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, गरज असेल तेव्हा शरद पवार यांना भेटणार आहे. नाना पटोले लोकांसाठी जगणारा कार्यकर्ता असून ते देशाला माहित आहे, मी भाजप सोडली, ती समोरून राजीनामा दिला. जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. पहाटेच्या शपथविधी बद्दल वेळ आल्यावर दादा बोलणार असे बोलले त्यांनी लवकर बोलावे, असा टोला नाना पटोलेंनी अजित पवार यांना लगावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 16-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here