औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही : राजेश टोपे

0

मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

हा वाद सुरु असतानाच संभाजीनगरचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही असं वक्तव्य आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो, असं ते म्हणाले.

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणं संभाजीनगर लोक म्हणतात. पण मला वाटत नाही की हा आज लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

14 तारखेला मुंबईत झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर हल्ला चढवला होता. फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना ‘ओ खैरे व्हा आता भैरे, औरंगाबादचा कायमचा झाला कसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला लगावला होता.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं की, फडणवीस मुख्यमंत्री असताना गेली पाच वर्षे अनेकदा मी त्यांना औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली. पण त्यांनी काही केलं नाही. तर मला भैरा नका म्हणू कारण तुमचा एक ज्येष्ठ नेता आमच्या इथं भैरा आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव दिले, तेव्हापासून आम्ही संभाजीनगरच म्हणतो असेही खैरे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here