उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा राजीनामा

0

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानातंर्गत मुंबईच्या बीकेसी इथं जाहीर सभा घेतली.

या सभेत शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा, मनसेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रश्नचिन्ह उभे केले. उद्धव ठाकरेंच्या या भाषणामुळे नाराज झालेले शिवसेनेचे नेते पुण्याचे माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी थेट शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

शाम देशपांडे यांनी पत्रक काढत म्हटलंय की, शिवसेना-भाजपा युती तुटल्याने अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे. भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे असं त्यांनी सांगितले.

शिवसेनेला फरक पडत नाही – गजानन थरकुडे

शिवसेना ही निष्ठावंतांची संघटना आहे. शाम देशपांडे यांना महापालिकेत तीनवेळा प्रतिनिधीत्व दिले. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापालिकेतील गटनेते, शहरप्रमुख, विधानसभेची उमेदवारी अशी पदे देऊनही ते समाधानी नव्हते. शिवसेनेबद्दल कृतघ्न असण्याऐवजी त्यांनी कृतघ्नपणा दाखवला. ते शिवसेनेत सक्रीय नव्हते. त्यामुळे त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी शाम देशपांडे यांनी स्वागताचे बॉर्ड लावले होते. यावरून देशपांडे यांची भूमिका स्पष्ट झाली होती. शिवसेनेने भरभरून देऊनही देशपांडे यांना जाणीव नसणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. शाम देशपांडे शिवसेनेत असले किंवा नसले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना हा निष्ठावंतांचा पक्ष आहे अशी टीका शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केली आहे.

कोण आहेत शाम देशपांडे?

शाम देशपांडे हे २००० ते २०१२ या कालावधीत शिवसेनेचे कोथरूडमधून नगरसेवक होते. २००८-०९ मध्ये महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. शाम देशपांडे १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here