‘कळझोंडी’ नवीन धरण बांधणीला विरोध

0

रत्नागिरी  : तालुक्यातील कळझोंडी धरणाचे आयुष्यमान संपले आहे. 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाला जॅकेटिंग करून त्याची उंची वाढवली जाणार आहे. एका उद्योगासाठी होणार्‍या या खटाटोपामुळे वरवडेचे तिवरे होऊ देणार नाही, असा इशारा वरवडे ग्रामसभेमध्ये एकमुखाने देण्यात आला. राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण गाव या विरोधात लढणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरद बोरकर, स्वाभिमानचे नेते प्रसाद ऊर्फ बाबू पाटील तसेच सरपंच निखिल बोरकर यांनी दिला. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दर्शवला. जयगडातील सात गावांत सतत निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर उपाय म्हणून 40 वर्षांपूर्वी कळझोंडी येथे धरण बांधण्यात आले. या धरणाच्या पाण्यावर शेती, बागायती होतात. त्याचबरोबर पाणी पिण्यासाठीही वापरले जाते. या धरण बांधणीत वरवडे गावाची लोकवर्गणी आहे. आता या धरणाची आयुष्य मर्यादा संपली आहे. हे जुने धरण दुरुस्त केले तरच वरवडे ग्रामपंचायतीअंतर्गत असणार्‍यांचे जीवन सुकर होणार आहे; परंतु शासनाने धरण दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून नवीन धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची कार्यवाहीही सुरू झाली आहे. नवीन कामात धरणाची उंची वाढल्यानंतर गावासमोर पाण्यासह शेती, बागायती करण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे नवीन धरण बांधणीला विरोध करण्यासाठी वरवडे ग्रामपंचायतीत रविवारी ग्रामसभा झाली. उद्योगासह औद्योगिक गावांना पाणी देण्यासाठी धरणाची उंची वाढवून ज्या गावचे धरण आहे, त्या वरवडेवर अन्याय केला जात आहे. अशा वेळी गावाने पक्ष वगैरे बाजूला ठेवून संघटित होऊन लढण्याची गरज असल्याचे सेनेचे शरद बोरकर आणि स्वाभिमानचे बाबू पाटील यांनी सांगितले. सरपंच निखिल बोरकर तसेच समीर बोरकर आदींनी आपला पाठिंबा व्यक्‍त केल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनीही टाळ्यांच्या गजरात सहमती दर्शवली. प्रसंगी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा इशाराही उपस्थित ग्रामस्थांनी दिला. नवीन धरण बांधण्यापूर्वी आहे त्या धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले पाहिजे. जनसुनावणीसुद्धा घेतली पाहिजे. परंतु याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here