संपूर्ण कोकण समृद्ध व्हावं हाच आमचा उद्देश : खासदार विनायक राऊत

0

सिंधुदुर्ग : जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटन योजना राबविण्यास आपण कटिबध्द आहोत. संपूर्ण कोकण समृद्ध व्हावं, हाच आमचा उद्देश आहे, असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने आलेल्या सिंधु कृषी औद्योगिक, पशू-पक्षी प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याला आज कुडाळ येथे दिमाखात सुरुवात झाली. त्याच्या उदघाटन प्रसंगी खासदार राऊत बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या वतीने कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या बाजूच्या मैदानावर हा कृषी प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दीपप्रजवलन करून झाले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल, संदेश पारकर, संजय पडते आदी उपस्थित होते.

या पर्यटन मेळाव्याला कुडाळ हायस्कूल येथून शोभायात्रा काढून सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. चित्ररथ, लेझीम पथक , बैल-घोडे, महिला बचतगट ही या मेळाव्यात सहभागी झाले होते.

मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, हे कृषी प्रदर्शन १०० टक्के यशस्वी होणार. जिल्हा प्रशासनाचे उत्तम नियोजन हे या प्रदर्शनाचे वैशिट्य होय. कोरोनानंतर आपला देश कोरोनामुक्तीकडे जात असून आजचे कृषी महोत्सव हा जिल्ह्यातील पहिला मास्कमुक्त कार्यक्रम आहे. येथे असलेल्या सर्व कृषी स्टॉल्समधून शेतकऱ्यांना फायदाच होईल. पूर्वीची चांदा ते बांदा योजना आता सिंधू-रत्न योजना झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा विकासाच्या दृष्टीने पुढे पॉल टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी एअरपोर्ट जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरेल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटन योजना राबविण्यास आपण कटिबध्द आहोत. संपूर्ण कोकण समृद्ध व्हावं, हाच आमचा उद्देश आहे, असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी के. मंजूलश्मी म्हणाल्या की, मास्क विरहित चेहरे बघून बरे वाटले. कोरोना गेल्यामुळे या कृषी मेळाव्यातून आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मी जिल्हा परिषद मध्ये काम केले आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी म्हणून आता कार्यरत असताना मला माझ्या माहेरी म्हणजे जिल्हा परिषदेत आल्यासारखे वाटले. जिल्हा परिषद हे माझं माहेर असल्याचे त्या म्हणाल्या.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, येत्या तीन दिवसात या कृषी प्रदर्शनांतून येथील शेतकरी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात. शासनाच्या योजनांचा फायदा घेणे आवश्यक असून बांदा ते चांदा योजना, भातखरेदी, हळद लागवड यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शेती क्षेत्रात उत्क्रांती झाली आहे. जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक पावर ट्रीलर, १३ शेतकरी बँका याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे पाठबळ असून त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. या प्रदर्शनातून जिल्ह्याच्या कृषीक्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आजची शोभायात्रा हे उत्कृष्ट नियोजनाचे उदाहरण होय. जिल्ह्याचे काम योग्य पद्धतीने केल्यास पुढील दोन वर्षात येथील कायापालट होईल. येथील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची जागृती होणे महत्त्वाचे असून पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना आखणे योग्य ठरेल.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रजित नायर यांनी करून सिंधू कृषी औद्योगिक, पशु-प्रदर्शन आणि पर्यटन मेळाव्याची थोडक्यात माहिती दिली. मेळाव्याला शेतकरी आणि पशुपालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 18-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here