कुडाळ : शनिवारी रात्रीपासून कोसळणार्या मुसळधार व वादळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जलमय झाला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. तर ग्रामीण भागातील कॉजवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. देवगड तालुक्यातील साळशी गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. सुख नदीला पूर आल्याने खारेपाटण बाजारपेठेसह वाघोटण खाडी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी घुसले आहे. दरम्यान, समुद्रही खवळलेला असून तोंडवळी, तळाशील, आचरा आदी गावांना उधाणाचा फटका बसला. शनिवारी रात्रीपासून मुसळधार कोसळणार्या पावसाने कुडाळ तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. रविवारी सकाळी झालेल्या वादळी मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा तालुक्याला बसला. माणगाव खोर्यातील आंबेरी पुलासह ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्याने सुमारे 30 ते 32 गावांचा संपर्क तुटला. कुडाळ पानबाजार येथे एका घरासह वाहनांवर चिंचेचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. नेरूर भागात पाच ते सहा घरांवर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात अन्य ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून सुमारे 10 लाख रु.हून अधिक नुकसान झाले. कुडाळ-मालवण रस्त्यावर नेरूर येथे, कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यावर पिंगुळी येथे, कुडाळ-सरंबळ रस्त्यावर रेल्वेस्टेशननजीक अशा ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे पडून वाहतूक ठप्प झाली. वाडोस येथे रस्त्यालगत एसटी बस रुतली. कुडाळातील डॉ.आंबेडकरनगरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला तर कुडाळसह पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, कविलकाटे, बांव, चेंदवण, सरंबळ या भागातील भातशेतीत पुराचे पाणी शिरले. ठिकठिकाणी वीज, दूरध्वनी सेवाही खंडित झाली.यामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी सकाळी वादळी वार्यासह जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी 5.45 वा.च्या सुमारास पानबाजार येथील जुबेदा शमशुद्दीन शेख यांच्या घरावर लगतचे चिंचेचे भलेमोठे झाड उन्मळून पडले. या घरात तीन भाडेकरू कुटुंबे राहतात. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घराजवळ उभी कार, मोटारसायकल, सायकल व टेम्पो ही वाहने चिंचेखाली चिरडली. यात सुमारे 5 लाख रु. अधिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, पोलिसपाटील अनंत कुडाळकर आदींनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच आपत्ती यंत्रणा व पोलिस प्रशासनाला माहिती दिली. कुडाळ पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार मंगेश जाधव, तलाठी श्री.रहाटे, न.पं.चे संदीप कोरगांवकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचयादी घातली. कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, सिद्धेश वर्दम, शैलेश वाळके, सौ.रेखा काणेकर, न.पं.चे कर्मचारी दीपक कदम आदींसह ग्रामस्थ हजर होते. त्यानंतर घरावर पडलेले झाड बाजूला करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. मात्र, हे झाड हटविण्यासाठी साहित्य उपलब्ध असलेली आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोचली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. केळबाईवाडी येथील शिवसेना शाखाप्रमुख सतीश कुडाळकर यांच्याही मांगरावर झाड पडून नुकसान झाले. पानबाजार येथे महादेव रमाकांत शिंदे यांच्या घरावर झाड पडून पत्र्यांचे नुकसान झाले. कुडाळ न्यायालयानजीक वीज पोलावर झाड पडून वीजपोल मोडून वीजपुरवठा खंडित झाला.
