रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल धरण दुरूस्तीच्या प्रतिक्षेत; दुरुस्तीचा प्रस्ताव ‘लाल फितीत’ अडकला

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सन 1965 साली उभारण्यात आलेले पहिले पानवल धरण आज अखेरच्या घटका मोजत आहे. या धरणाच्या दुरूस्तीसाठी मध्यंतरीच्या काळात काँक्रीटची भिंत उभारून धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण काँक्रीट भिंत उभारावी की अन्य प्रकारे दुरूस्ती करावी यासाठी नाशिकची ‘मेरी’ या संस्थेकडून धरण दुरूस्तीसाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर या धरणदुरूस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे 10 कोटींची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठ्यावर येणारा ताण मार्गी लावण्यासाठी सध्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. रत्नागिरी शहराला प्रामुख्याने शीळ, पानवल व नाचणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील पाणीसाठा दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मर्यादा येते. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त येते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत नगर परिषद प्रशासनाकडून केली जाते.

अशावेळी सन 1965 साली रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पानवल धरणाची पहिली बांधणी करण्यात आली. धरणाच्या दुरूस्तीसाठी डागडुजीसाठी सन 2016 साली तत्कालीन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या कार्यकाळात प्रशासनस्तरावर 9 कोटी निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर मात्र या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे धरणाची डागडुजी कधी होईल याचाही नेम देता येत नाही. नवीन धरण बांधायचे झाल्यास सुमारे 6 वर्षे तरी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र आज दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेले जुने पानवल धरण अखेरच्या घटका मोजत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या धरणाच्या दुरूस्तीसाठी जरी प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी या धरणाच्या जागी नवीन धरण बांधणे अनिवार्य आहे का? याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू आहे. त्यामुळे या धरणाच्या मजबुतीकरण व दुरूस्तीसाठी सुमारे 10 कोटींची आवश्यकता लागणार आहे.

त्याचबरोबर शीळ धरणाच्या सांडव्यालगत असलेल्या दरडीच्या भागात गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे सांडवा सुरक्षित रहावा यासाठी भुस्खलनाच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव 12 कोटी 24 लाखांचा असून त्याला मंजूरी मिळणे बाकी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:22 PM 20-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here