‘जनता कर्फ्यू’मुळे रत्नागिरीत दूध आणि वृत्तपत्रांचा तुटवडा

0

रत्नागिरी : पंतप्रधानांनी जाहीर केल्यानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यात जनता संचारबंदी उस्फूर्तपणे पाळण्यात आली. मात्र रत्नागिरी जिल्ह्याला प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून होणारा वृत्तपत्रे आणि दुधाचा पुरवठा आज होऊ शकला नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार लिटर दूध कोल्हापूर, सांगली, मिरज परिसरातून येते, तर सुमारे ४० हजार वृत्तपत्रेही दररोज जिल्ह्यात कोल्हापूरहून येतात. जनता संचारबंदीमुळे काही वृत्तपत्रांनी आजचे वृत्तपत्र प्रसिद्ध होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र काही वृत्तपत्रे कोल्हापूरला प्रसिद्ध झाली, तरी जनता संचारबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने ती जिल्ह्यात येऊ शकली नाहीत. स्थानिक वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली असली तरी वृत्तपत्रांचे स्टॉल बंद असल्यामुळे घरोघरी वृत्तपत्रे पोहोचू शकली नाहीत. दूरदर्शनच्या वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियामुळे वाचकांना अद्ययावत माहिती मात्र मिळण्यात अडचण आली नाही. गोकुळ आणि वारणा या प्रमुख दूध उत्पादक संस्थांसह इतर काही दूध संघाचे दूधही रत्नागिरी जिल्ह्यात येते. सुमारे ५० हजार लिटर दुधाचा पुरवठा रत्नागिरी जिल्ह्याला सांगली, मिरज आणि कोल्हापूर भागातून दररोज होत असतो. हे दूध आज न आल्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय झाली. जिल्ह्यातील प्रमुख पुरवठादार निखिल देसाई यांनी गोकुळ संघाचे दूध आज येणार नसल्याचे कालच जाहीर केले होते. स्थानिक दूध उत्पादकांनी आपला नियमित रतीब घातला, पण काही ठिकाणी आपण आज दूध पुरवणार नसल्याचे कालच त्यांनी सांगितले होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here