जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना जपानमधील ऑलिंपिक आणि पॅराऑलिंपिक स्पर्धांवरही त्याचं सावट पहायला मिळत आहे. टोकियो ऑलिंपिक होणार की नाही, असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे कॅनडानं या ऑलिंपिकमधला आपला सहभाग रद्द केला आहे. पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी केल्यानंतर काही वेळातच कॅनडाने आपले खेळाडू ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. ऑलिंपिक स्पर्धा रद्द होणार नाही, पण ती पुढं ढकलणे हाच सध्याच्या परिस्थितीतला एकमेव पर्याय असल्याचंही शिंझो आबे यांनी म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियन टीमनंही आपल्या खेळाडूंना 2021 च्या स्पर्धेसाठी तयार राहण्याची सूचना केली आहे. टोकियो ऑलिंपिक जुलै 2020 मध्ये होणार होती.
