”छत्रपती घराण्याचे वारस स्वत:हून शिवसेनेकडे गेले होते, पण त्यांचा सन्मान झाला नाही”

0

मुंबई : छत्रपती घराण्याचे वारस संभाजीराजे हे स्वत:हून शिवसेनेकडे मदत मागण्यासाठी गेले होते. मात्र, शिवसेनेने त्यांना सन्मानित करण्याऐवजी उमेदवारी नाकारली. खरंतर शिवसेनेला छत्रपतींच्या गादीचा सन्मान करण्याची संधी चालून आली होती. पण ही संधी शिवसेनेने गमावली, असे मत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले.

शिवसेनेने युवराज संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी समर्थन देणार नाही, अशी भूमिका घेतली. देशात केवळ दोनच गाद्यांना महत्त्व आहे, त्या म्हणजे कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी. प्रश्न हा खासदारकीचा नाहीच. कोणालाही कुठूनही खासदार होता येईल. छत्रपतींच्या गादीचे वारस स्वत:हून शिवसेनेकडे गेले होते. पण शिवसेनेने त्यांना सन्मानित करण्याऐवजी उमेदवारी नाकारली. या सगळ्यामागे राजकारण असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले.

यावेळी विनोद पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांची फसवणूक झाल्याचीही शक्यता बोलून दाखवली. संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीला उभे राहताना काहीतरी रणनीती आखली असेल. त्या रणनीतीमध्ये मध्यस्थ कोण होते, महाविकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल, असे त्यांना कोणी सांगितले? त्यांचं कोणाशी बोलणं झालं, हे संभाजीराजे यांनी जाहीर करावे. जेणेकरून संभाजीराजे यांची फसवणूक कोणी केली, हे शिवभक्तांना कळेल, असेही विनोद पाटील यांनी म्हटले.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेतील सहाव्या जागेवरून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यासाठी संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, राज्यसभेतील सहाव्या जागेवर शिवसेनेने दावा सांगितल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास सहाव्या जागेवरून आम्ही त्यांना उमेदवारी देऊ, अशी अट शिवसेनेने घातली होती. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे आता शिवसेनेने सहाव्या जागेवरून संभाजीराजे यांच्याऐवजी संजय पवार यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

मराठा संघटना आक्रमक

कालपासून राज्याच्या विविध भागांमधील मराठा संघटनांचे समन्वयक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे कार्यकर्ते आणि समर्थक कालपासूनच मुंबईत तळ ठोकून आहेत. आता मराठा संघटनांचे सर्व समन्वयक मुंबईत दाखल झाल्यानंतर एकत्र बसून आगामी रणनीती आखली जाईल. मराठा समन्वयक आणि संभाजीराजे यांची बुधवारी रात्री किंवा उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 25-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here