गिमवी (गुहागर) : रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. बाजारपेठेत दोन ते अडीच फूट पाणी असल्यामुळे बाजारपेठ परिसरासह जुना बाजार पूल, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिंचनाका भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट या परिसरात अद्यापही पाणी आहे. रविवारी रात्री वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खबरदारी म्हणून ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प आहे. चिपळूण कराड मार्गसुद्धा अध्यापही ठप्पच आहे. कोयनानगर येथील हेळवाक परिसरात पाणी भरल्याने हा महामार्ग ठप्प आहे. आज दिवसभर पाऊस असाच कायम राहिला तर पुन्हा एकदा चिपळूण परिसरात पूरस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा असे आव्हान नागरिकांना केले आहे.
