सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाली नसल्याने कुवारबाव ग्रामपंचायतीचे नुकसान : सतेज नलावडे

0

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये २८ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आली. ती चालू करण्यासाठी सुमारे दोन-अडीच वर्षांचा कालावधी उशीर करण्यात आला. यामुळे गावाचेच नुकसान झाले. त्यावर कहर म्हणजे दोन महिन्यांपूर्वी या योजनेचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांनी केले. परंतु या बसवलेल्या प्रणालीचा उत्पादन मीटर कार्यान्वित केलेला नाही. महावितरण म्हणते, जुना मीटर चालणार नाही, नवीन बसवावा लागेल. मग उद्घाटनाची घाई का केली, जुना मीटर बसवण्यास जबाबदार कोण, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सतेज नलावडे आणि भाजपा जिल्हा संघटक राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

सौर ऊर्जा प्रणालीमुळे ग्रामपंचायचे पैसे वाचणार आहेत. काजरघाटी धारेवर सौर पॅनेल बसवण्यात आली आहेत. माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी ही योजना मंजूर केली होती. जिल्हा परिषद कृषी विभागाने निविदा काढून ही यंत्रणा बसवली होती. योजना पूर्ण होऊनही त्याचे उद्घाटन दोन-अडीच वर्षे उशिरा करण्यात आले. याचेही कारण गुलदस्त्यात आहे. दोन महिन्यांपूर्वी या यंत्रणेचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले. परंतु जनरेशन मीटर कार्यान्वित न झाल्यामुळे ही यंत्रणा कशी काम करणार, असा प्रश्न आम्हाला पडल्याचे नलावडे यांनी सांगितले.

बसविलेला मीटर जुना असून तो चालणार नाही, असे पत्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. आता नवीन मीटर बसवावा लागणार आहे. मग उद्घाटन करण्याची घाई का केली? तसेच मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केले. पण आता यंत्रणा बंद पडल्याने मंत्र्याचाही एक प्रकारे अवमान केला गेला आहे, असे स्पष्ट मत नलावडे यांनी व्यक्त केले.

संबंधित अधिकाऱ्यांनाही या मीटरसंदर्भात प्रश्न विचारला. या मीटरची जबाबदारी त्यांचीच आहे. कृषी विभागाने प्रक्रिया योग्यपणे राबवली नाही का? खरे तर कुवारबावचा सौर ऊर्जा प्रणाली प्रकल्प तालुक्यातील सर्व गावांसाठी आदर्श ठरणारा आहे. मात्र चुकीच्या गोष्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अदृश्य हात मदत करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 27-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here