संजय राऊत तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर; संभाजीराजेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार?

0

मुंबई : राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. संभाजीराजे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. काहीवेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. आता दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते, ते पाहावे लागेल. या चर्चेनंतर शिवसेनेकडून संभाजीराजे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांचे आरोप कशाप्रकारे खोडून काढणार, हे पाहावे लागेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या काही आमदारांनी संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा द्यायची तयारी दर्शविली होती. संभाजीराजे यांचा राज्यसभा निवडणुकीचा अर्जही भरून तयार होता. कालपर्यंत संभाजीराजे यांना अर्ज भरण्यासाठी १० आमदारांचे अनुमोदनही मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या निवडणूक अर्जावर १४ आमदारांच्या सह्या असल्याचे समजते. त्यामुळे संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवायचे ठरवले असते तर शिवसेनेसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, संभाजीराजे यांनीच आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

संभाजीराजे छत्रपतींनी उद्धव ठाकरे यांच्यावर नेमका काय आरोप केला?

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 27-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here