मुसळधार पर्जन्यवृष्टीने महाडमध्ये पुन्हा पुराचे पाणी शिरले

0

महाड : गेल्या पाच दिवसात चौथ्या दिवशी सावित्री नदीच्या पाण्याने महाड शहरात प्रवेश केला.महाड शहरातील मुख्य बाजारपेठेत  बागडे गल्ली ते कदम बंधू जनरल स्टोअरपर्यंत पाणी पोहोचले आहे. गांधारी, दस्तुरी नाका व काजळपुरा परिसर पुन्हा एकदा जलमय झाला आहे. गेल्या पाच दिवसापासून वारंवार येणाऱ्या पुराने महाडकर नागरिक हवालदिल झाले आहेत. रात्रभर मुसळधार पर्जन्यवृष्टीने आजचा दिवस पुन्हा एकदा महाडकरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्राप्त माहितीनुसार महाड तालुक्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी रात्री मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, भोर परिसरात पाणी आल्याने महाड भोर मार्गे पुणे मार्गावरील एसटी बससेवा बंद करावी अशी सूचना भोर पोलिसांकडून महाड एसटी आगाराला करण्यात आलयाची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. काल सायंकाळपासूनच वाढलेले पाणी रात्री उशिरा पूर्णपणे उतरले होते. मात्र आज पहाटे पाचच्या सुमारास पुन्हा एकदा सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या एक तासात नगरपालिकेने दोन वेळा सायरन वाजवुन नागरिकांना सतर्कतेचे इशारे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here