शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्र सर्वोत्कृष्ट

0

रत्नागिरी : स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या आणि संशोधनात सातत्य असलेल्या शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील कृषी संशोधन केंद्राला सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार प्राप्त झाला असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.

हा पुरस्कार विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनात उपमहानिदेशक भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (नवी दिल्ली) डॉ. ए. के. सिंग यांच्या हस्ते आणि माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, डॉ. श्रीरंग कद्रेकर, कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.

कोकण कृषी विद्यापीठाची कोकण विभागामध्ये एकूण १६ केंद्रे कार्यरत आहेत. या संशोधन केंद्रामधून शेतीविषयक संशोधन आणि विस्तारकार्य करण्यात येते. शंभर वर्षांच्या कार्यकाळात शिरगाव कृषी संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या भात, भुईमूग पिकाच्या विविध जाती शेतकऱ्यांसाठी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे. केंद्राने उत्पादित केलेली कलमे, रोपे, मिळवलेले आर्थिक उत्पन्न, केलेले विस्तार कार्य, कार्यरत शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेले लेख, पुस्तके, घडीपत्रिका, संशोधन केंद्रावर निर्माण केलेल्या सोयीसुविधा, बहि:स्थ संस्थांकडून मिळवलेले संशोधन प्रकल्प व निधी, संशोधन केंद्राची तत्परता आणि कार्यक्षमता या विविध अंगांचा विचार करून विद्यापीठाने सर्व संशोधन केंद्राकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या संशोधन केंद्राच्या प्रस्तावाची छाननी प्रथम विद्यापीठ स्तरावर व नंतर राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांकडून करण्यात आली. या सर्व चाचण्यांमधून शिरगाव केंद्राची उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून निवड करण्यात आली, याचा आनंद असल्याचे डॉ. दळवी यांनी सांगितले.

कृषी संशोधन केंद्राच्या देदीप्यमान वाटचालीत डॉ. भरत वाघमोडे माजी प्रभारी अधिकारी, इतर कर्मचारी व मजूरवर्गाचे मोलाचे योगदान असल्याचे डॉ. दळवी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here