दापोली रिसॉर्ट प्रकरण: विभास साठेंना सुरक्षा पुरवा, त्यांचा ‘मनसुख हिरेन’ होण्याची भीती : किरीट सोमय्या

0

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरील कथित रिसॉर्ट प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.

या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले आहे.

ईडीने 26 मे रोजी अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश यात होता.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे “मनसुख हिरेन” होऊ नये. विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.

दरम्यान, दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आपल्यावर कारवाई केली, यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी ईडीने केलेल्या चौकशीनंतर दिली होती. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

विभास साठे कोण?
अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉटसाठी जमीन खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीचं पथक पुण्यात पोहोचलंय. साठे यांच्याकडून1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला.

मनसुख हिरेन कोण?
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेली कार आढळली होती. ही कार ठाण्यातील मनसुख हिरण यांची असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 31-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here