एकीकडे करोना व्हायरसचं संकट असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थ विधेयक २०२० मध्ये सरकारनं इंधनाच्या उत्पादन शुल्कात १८ रूपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचे अधिकार मिळवले आहेत. सध्या रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यादरम्यान कच्च्या तेलाचं दरयुद्ध सुरू आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. या परिस्थितीत सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नव्या विधेयकानुसार सरकारला पेट्रोलवर १८ रूपये तर डिझेलवर १२ रूपयांपर्यंत उत्पादन शुल्क वाढवण्याचा अधिकार मिळाला आहे. यापूर्वी इंधनावर उत्पादन शुल्क लावण्याची मर्यादा कमी होती.
