रत्नागिरी
कलम 370 हटवण्याचा आणि जम्मू काश्मीर व लडाख अशा विभाजनाचा भाजपा प्रणीत केंद्र शासनाच्या निर्णयानंतर रत्नागिरी भाजपाने घोषणाबाजी व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुकही करण्यात आले.
भाजप कार्यालयात छोटेखानी सभा झाली. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह अनेकांनी काश्मिरसाठी बलिदान दिले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. अॅड. बाबा परुळेकर यांनी कलमातील महत्त्वाचे मुद्दे व फायदे सांगितले. 35 अ या कलमाची घटनेत नोंद नसल्याने ते दूर करण्यात आल्याचे सांगितले. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर जनतेच्या मनातल्या आणि अखंड हिंदुस्थानचे स्वप्न सत्यात उतरवण्याकडे भरीव पाऊल टाकले आहे. हा धाडसी निर्णय आज घोषित झाल्याने करोडो देशवासियांना आनंद होत आहे. या निर्णयाचे जिल्हा भाजप स्वागत करत असून मोदी-शहा व केंद्र शासनाचे अभिनंदन करणारा ठराव करत आहोत.
जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मिर हमारा हैं अशा घोषणा दिल्या. तसेच फटाके फोडून जल्लोष केला. या वेळी अॅड. विलास पाटणे, सचिन वहाळकर, प्रशांत डिंगणकर, बिपीन शिवलकर, उमेश कुळकर्णी, सतीश शेवडे, सर्व नगरसेवक, मंदार मयेकर, संदीप रसाळ, महेंद्र मयेकर, अनिकेत पटवर्धन, महेंद्र जैन, दीपक साळवी, टी. जी. शेट्ये, विकास सावंत, भाई जठार, मनोज पाटणकर, ऐश्वर्या जठार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
