चिरायुमधील प्रगत एमआरआय मशीन कोकणातील वैद्यकीय क्षेत्रासाठी ‘मेडिकल फॅसिलिटी अंब्रेला’ ठरेल

0

◼️ चिरायु मध्ये वैद्यकीय परिसंवाद संपन्न, प्रगत एमआरआय मशीन उपयोगाबाबत दिली माहिती

◼️ मशीनद्वारे १० दिवसांपासून रूग्ण तपासणी सुरू

रत्नागिरी : फुजिफिल्म कंपनीच्या एचलोन स्मार्ट या अत्याधुनिक, अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या एम आर आय मशिनचे भारतातील सर्वप्रथम आगमन रत्नागिरीच्या चिरायू हॉस्पिटलमध्ये झाले असून हे मशीन रुग्णाच्या सेवेत दाखल झाले आहे. त्यामुळे चिरायुच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोणत्याही आजाराचे तत्काळ निदान करण्यासाठी हे प्रगत एमआरआय मशीन कोकणवासीयांसाठी वरदान ठरणार आहे. चिरायुची ही प्रगत सुविधा जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय संस्थांसाठी ‘ ‘मेडिकल फॅसिलिटी अंब्रेला’ ठरेल, असा विश्वास शनीवारी झालेल्या वैद्यकीय परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

याचेच औचित्य साधून विविध प्रकारच्या वैद्यकीय व्याधींसाठी कोणते स्कॅन करायचे व या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गंभीर रुग्ण अथवा शरीराच्या क्लिष्ट ठिकाणी असलेल्या रोगाच्या निदानासाठी कशा प्रकारे करता येईल, याबाबतची माहिती शनिवारी चिरायु हॉस्पिटलतर्फे झालेल्या वैद्यकीय परिसंवादामध्ये देण्यात आली. मशीनद्वारे १० दिवसांपासून रूग्ण तपासणी सुरू झाली आहे.

या माहितीपूर्ण परिसंवादासाठी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले , जुनेजाणते व ज्येष्ठ डॉक्टर्स ज्यात डॉ. रमेश चव्हाण, डॉ. सुनील औरंगाबादकर, डॉ. संजय लोटलीकर तसेच डॉ. मतीन परकार, डॉ. मनोज मणचेकर, डॉ. सुधांशु व डॉ. कल्पना मेहता, डॉ. अरुण नलावडे, डॉ. अमोल पटवर्धन, डॉ. चंद्रशेखर अपराध, डॉ. अनिरुद्ध फडके व इतर प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक तसेच बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर श्री. सावंतदेसाई उपस्थित होते. याचबरोबर सॅनरॅड कंपनीतर्फे डॉ. अनिरुद्ध ऊंनी व फुजिफिल्म हेल्थकेअरतर्फे फ्रान्सिस कारांटो हे देखील उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रत्नागिरीतील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी नुकतेच डी एन बी या परीक्षेत प्रेसिडेंट गोल्ड मेडलचे विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, त्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
त्यानंतर परिसंवादाला सुरवात झाली. यात डॉ. सचिन यादव, डॉ. श्रीविजय फडके, डॉ. अभिजित पाटील , डॉ. नितीन चव्हाण हे तज्ञ डॉक्टर्स आणि डॉ. ऊंनी तसेच श्री. फ्रान्सिस यांचा सहभाग होता.

गेल्या काही दिवसांत शरिराच्या विविध अवयवांच्या झालेल्या तपासण्या व त्यातून या नवीन सुविधेचा वापर करून रोगाची अचूक माहिती मिळूवून त्यावर योग्य प्रकारे केलेले उपचार, अश्या काही विशिष्ट तपासण्यांबद्दल यावेळी चर्चा झाली. या स्कॅन मशीनमध्ये अंतर्भूत असलेल्या विशेष व आधुनिक सुविधा यांची माहिती देण्यात आली. ज्याचा उपयोग भविष्यात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी होऊ शकतो.

विविध प्रकारचे मेंदूविकार असलेले रुग्ण – अर्धांगवायू, मेंदूतील रक्तस्त्राव, आकडी आलेले रूग्ण, कंपवात यांची कारणे व निदान, मेंदूतील गाठ – कँसरची आहे की नाही, असली तर कोणत्या प्रकारची आहे व त्याचे केमिकल अनालिसिस , शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची व योग्य ठिकाणी जाऊन इतर नाजूक भागांना इजा न होता कशी करायची याची माहिती शस्त्रक्रिया करण्याआधी मिळते. याचा उपयोग रूग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी होतो. कॅन्सर झालेल्या पेशंटच्या शरीरात त्याचे प्रमाण किती ठिकाणी आहे किंवा त्याचा प्रादुर्भाव कोणत्या अवयवात झालाय याची विस्तृत व अचूक माहिती मिळते. अन्ननलिका व त्याच्या विविध भागातील व्याधींसाठी याचा उत्तम प्रकारे उपयोग होतो. विशेषतः गुदद्वाराच्या आजारांचे निदान जे नेहमीच्या तपासण्यानी होत नाही, याकरिता खूप चांगल्या पद्धतीने निदान करता येते.

तसेच एम आर सी पी या अतिविशीष्ट व अचूक असणाऱ्या सुविधेचा वापर स्वादुपिंड व पित्ताशय यांच्यातील असलेल्या सूक्ष्म नलिका व त्यांच्यामुळे होणारे आजार याची माहिती कोणतेही कॉन्ट्रास्टचे इंजेक्शन शरीरात न देता मिळते. मूत्रनलिका, मूत्रपिंड व त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या व्याधींचे निदानसुद्धा करता येते. या मशीनमध्ये असणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाची उपयुक्तता अतिशय गंभीर अथवा बेशुद्ध किंवा स्थिर न राहणाऱ्या पेशंटचे स्कॅन करताना इतर मशिन्स मध्ये येते. यामध्ये अजिबात येत नाही याचे कारण रॅपिड सिक्वेन्स व रडार पध्दतीचा केलेला वापर. यामुळे स्कॅन करण्याच्या वेळेमध्ये ५० ते ६० टक्के बचत होऊन निदान अचूकपणे करता येते.

शरीरातील सांध्यांच्या तपासणीसाठी अतिशय उपयुक्त अशा या मशीनची वैशिष्ट्ये आहेत. सांध्याच्या आवरणाची झीज किती प्रमाणात झाली, त्याची माहिती बाकी मशीनमध्ये मिळत नव्हती. त्यात फक्त सांध्यांच्या शिरा यांची स्थिती व इजा अशी अल्प माहिती मिळायची. छोटे सांधे – मनगट, हातांची व पायांची बोटे, घोटा यांची तपासणी पूर्वीच्या मशीन द्वारे तितकी चांगल्या पद्धतीने होत नव्हती ज्यामुळे निदान व उपचार दोन्हीसाठी त्रास होत असे. पण या मशीनची खासियत म्हणजे अति सूक्ष्म किंवा खोल ठिकाणी असलेल्या व्याधीचे अचूक माहिती मिळून उपचारासाठी योग्य दिशा ठरविणे सोपे जाते.
नसांचे विविध प्रकारच्या कारणांमुळे होणारे आजार ज्यात शरीराच्या कोणत्याही भागातील नस दबली गेली / इजा झाली याचे न्यूरोग्राफी या तंत्राद्वारे निदान होऊ शकते. ज्याचा उपयोग कान, नाक , घसा तज्ञ तसेच डेंटिस्ट यांनासुद्धा होऊ शकतो.

या सर्व प्रकारच्या तपासण्या अतिशय कमी वेळ व उत्तम गुणवत्ता असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अश्या फुजिफिल्म एचलोन स्मार्ट एम आर आय स्कॅन मशीनद्वारे शक्य आहेत. त्याचा सर्वांनी योग्य प्रकारे उपयोग करून रुग्णांना एक नाविन्यपूर्ण सुविधेचा लाभ नक्कीच देता येईल, असा विश्वास चिरायु हॉस्पिटलच्या व्यवस्थापनेने व्यक्त केला आहे. या परिसंवादाला वैद्यकीय प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 06-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here