महिनाभरात तब्बल चार लाख पर्यटकांनी दिली गणपतीपुळेला भेट

0

रत्नागिरी : कोरोनातील निर्बंध उठल्यानंतर पर्यटनासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवर गर्दी केली होती. त्याचा फायदा पर्यटन व्यावसायाला झाला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) राज्यातील निवासस्थानांपैकी गणपतीपुळेतील निवास व्यवस्थेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. एक कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मे महिन्यात मिळाले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. महिन्याभरात ४ लाखाहून अधिक पर्यटकांनी पुळ्याला भेट दिल्याचा अंदाज आहे.

यंदा वर्षाच्या आरंभीला कोरोनाचे बाधित कमी झाल्यामुळे राज्य शासनाने निर्बंध उठवले. त्याचा फायदा पर्यटनाला झाला. कोकणातील किनार्‍याकडे पर्यटकांचा ओघ वाढला. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, गुहागर, दापोलीसह सिंधुदुर्ग, रायगडमधील किनार्‍यांवर पर्यटकांचा राबता अधिक होता. यामध्ये सर्वाधिक गर्दी गणपतीपुळेत पहायला मिळाली. ६ मे २०२२ पासून दिवसाला सरासरी दहा ते पंधरा हजार पर्यटक हजेरी लावून परतत होते. शनिवारी, रविवारी दुप्पट पर्यटकांची नोंद होत होती. गणपतीपुळे मंदिरामध्ये किती भक्तांनी दर्शन घेतले याची नोंद ठेवली जाते. यावरुन ही आकडेवारी तपासता येते. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांचा सर्वाधिक ओढा गोव्यातील किनार्‍यांकडे ओढा होता; मात्र यंदा मे महिन्यात पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरासह किनार्‍यांवर येणे पसंत केले. अजुनही दिवसाला पाच ते सहा हजार पर्यटक ये-जा करत आहेत. याचा सर्वाधिक फायदा निवास व्यवस्थेसह हॉटेल वाल्यांना झाला. कोरोनामुळे डबघाईला आलेल्या हॉटेलवाल्यांना दिलासा मिळाला आहे.

गणपतीपुळेत निवासासाठी एमटीडीसीच्या रिसॉर्टला पसंती दिली होती. याठिकाणी वातानुकूलित आणि सर्वसाधारण मिळून १२० खोल्या आहेत. मे महिन्यात सर्वच्या सर्व दिवस ही निवासं हाऊसफुल्ल होती. हे एकप्रकारे रेकार्डच ठरले आहे. मे महिन्यामध्ये एमटीडीसीला दिवसाला सुमारे चार लाखापर्यंत व्यावसाय होत होता. महिन्यात १ कोटी १० लाख रुपयांचा व्यावसाय एकट्या गणपतीपुळेमधून झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. राज्यात एमटीडीसीची सुमारे २५ निवासे आहेत. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली, कुणकेश्‍वर आणि रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, वेळणेश्‍वरमध्ये निवास व्यवस्था आहे. गणपतीपुळेमध्ये पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. कोरोना काळात कर्मचार्‍यांना अतिथी देवो भव प्रमाणे व्यवस्था करण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. एमटीडीसीत आल्यानंतर पर्यटकांचे स्वागत कक्षात माहिती देऊन समाधान केले जाते. कक्षामध्ये इतर पर्यटन स्थळांची माहिती दिली जाते. एमटीडीसीमधील संपुर्ण परिसर बॅटरीवरील कारमधून फिरण्याची व्यवस्था केली होती. जवळच गणपतीपमुळे मंदिर असल्यामुळे पर्यटकांना सकाळी दर्शनाचा लाभ घेता येत होता. एमटीडीसीचे स्वतःचे बोट क्लब असल्यामुळे समुद्र सफरीचा आनंदही पर्यटक घेत होते. त्यामुळेच पर्यटकांचा ओघ यंदा वाढल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:06 PM 08-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here