अधिक उमेदवार देऊन भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे : संजय राऊत

0

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाचव्या आणि सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

येत्या 20 जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या 10 जागांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने बुधवारी पाच जागांची घोषणा करताना सहावी जागादेखील लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपच्या भूमिकेवर आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडून अधिक उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या भूमिकेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली. भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. त्यांना राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करायची असल्याचे राऊत यांनी म्हटले.

औरंगाबाद येथे बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी समाचार घेतला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वच मुद्यांवर भाष्य केले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी भाषणात राजकीय भूमिका स्पष्ट केली. काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या सभेवर, भाषणावर विरोधकांनी टीका करावी असे त्यात काय होते, असा उलट सवाल राऊत यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावी असेही त्यांनी म्हटले.

मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचालीची शंका

राज्याच्या राजकारणातून मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत का, अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा आजही प्रभाव असल्याचे राऊत यांनी सांगितले.

विधान परिषदेतील संख्याबळ काय सांगते?

विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 09-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here