नवी दिल्ली : भारताची प्रतिभावंत कुस्तीपटू विनेश फोगट हिने वॉर्सा, पोलंड येथे सुरू असलेल्या पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली. तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत २४ वर्षीय विनेश हिने पोलंडच्या रोकसाना हिच्यावर ३-२ असा विजय मिळवला. ‘फायनल प्रवेशापूर्वी विनेश हिने उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनच्या सोफिया मॅटसन हिच्यावर मात केली होती. सोफिया हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. पोलंड खुल्या स्पर्धेपूर्वी विनेश हिने ग्रॉप्रि ऑफ स्पेन आणि यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (इस्तंबूल, तुर्की) या स्पर्धात सुवर्ण कामगिरी केली होती. भारताचा माजी हॉकी कर्णधार वीरेन स्किना यांनी विनेश फोगट हिचे अभिनंदन केले आहे.
