यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात २६ वेळा येणार मोठे उधाण..

0

रत्नागिरी : एरव्ही नितांत सुंदर आणि शांत असणारा सागर पावसाळ्यात मात्र रौद्ररूप धारण करतो. त्याचे हे रौद्ररूप अनेकवेळा किनाऱ्यावरील नागरी वस्तीला अनुभवास येते.

त्यातही पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात, ज्यावेळी समुद्राला मोठे उधाण येते. त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये २६ वेळा मोठे उधाण येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.

पावसाळ्यात जून महिन्यात ६ वेळा, जुलै महिन्यात ७ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा आणि सप्टेंबर महिन्यात ६ वेळा मोठे उधाण येणार आहे.

जूनमध्ये मंगळवार १४ जूनपासून शनिवार १८ जून हे सलग ५ दिवस मोठ्या भरतीचे असून याकालावधीत २ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उठणार आहेत. तर ३० जून रोजीही दुपारी मोठी भरती येणार असून दोन मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठतील असा अंदाज आहे.

या उधाणाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी याकाळात दक्ष राहून होणाऱ्या जीवित व वित्त हानीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना दोरा बावटा लावला जातो. तसेच या काळात मच्छीमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे.

मोठी भरती आणि जोरदार पाऊस एकाच वेळी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या या नाले व गटारामध्ये तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मोठ्या भरतीच्या काळात जास्तीत जास्त घरीच राहण्याचा प्रयत्न करावा. आकाशवाणी तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेऊन त्याचे पालन करावे. पाणी शिरण्याची शक्यता असलेले किनाऱ्यावरील तसेच खाडी किनाऱ्यावरील वस्तिस्थान रिकामे करून तात्पुरते स्थलांतर करावे. स्थलांतरावेळी कंदील. टॉर्च, खाण्याचे सामान, पाणी, कोरडी कपडे, महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत. पाण्यात अडकल्यास सोडवण्यासाठी आलेल्या टीमला सहकार्य करावे.

या दिवशी येणार उधाण : जुलै महिन्यामध्ये बुधवार १३ जुलै ते रविवार १७ जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात २ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच ३० व ३१ जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवार ११ ऑगस्ट ते सोमवार १५ ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे. याही कालावधीत २ ते सव्वादोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच २९ व ३० ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर हे मोठ्या उधाणाचे दिवस असून या काळात २ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 09-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here