नवी दिल्ली : भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाने स्पेनच्या कोटीफ चषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या दुसर्या सामन्यात बोल्वियाला 3-1 गोलने हरवले. भारताकडून रतनबाला देवीने दोन आणि बालादेवीने एका गोलची नोंद केली. पहिल्या सामन्यात स्पेनच्या विल्लारियल क्लबकडून 0-2 असा पराभव पत्करल्यानंतर भारतीय महिला संघाने दुसर्याच सामन्यात पुनरागमन केले. बोल्वियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पहिल्याच मिनिटाला पिछाडीवर पडला. याला कारणही भारतीय खेळाडूच होती. स्विटी देवीने केेलेल्या आत्मघाती गोलमुळे बोल्वियाला आयती आघाडी मिळाली. परंतु, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच बालादेवीने विरोधी संघाच्या पेनाल्टी क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून शानदार फटका मारत गोल केला आणि भारताला बरोबरी मिळवून दिली. यानंतर 36 व्या मिनिटाला डाव्या बाजूकडून मिळालेल्या क्रॉसवर हेडर रतनबालाने मारल्यामुळे भारताला आघाडी मिळाली. त्यानंतर रतनबालानेच आपला दुसरा गोल नोंदवून भारताला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
