कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून भंगसाळ (कर्ली) नदीने धोक्याची पातळी ओलांडत रूद्रावतार धारण केले आहे. गेले दोन- तीन दिवस तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पहाटे पासून मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळबांबर्डे, पावशी, कुडाळ काळपनाका दरम्यान सर्व्हीस व नवीन रस्त्यावर पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. पावशी घावनळे फाटा,काळपनाका येथे रात्रीपासूनच वाहतूक बंद झाली आहे. महामार्ग ठप्प झाल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गासह नागरिकांचे प्रचंड हाल निर्माण झाले. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. माणगांव खो-यातील आंबेरी पुलासह दुकानवाड दशक्रोशीतील काजवे पाण्याखाली गेल्याने सुमारे 30 ते 32 गावांचा संपर्क तुटला आहे. कुडाळ भंगसाळ नदी, पावशी बेलनदी, वेताळबांबर्डे हातेरीनदी, हुमरमळा पिठढवळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी लगतच्या घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय भातशेतीतही पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ शहरातील हॅाटेल गुलमोहर नजिक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर अधिक वाढला असून जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूक, वीज, दूरध्वनी सेवा कोलमडून गेली आहे.
