शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय; ठाकरे सरकारला हायकोर्टाने सुनावले खडे बोल

0

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे निखिल भामरे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती.

जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. शरद पवार यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने गौरविण्यात आले आहे. परंतु, तुमच्या कृतीने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. एका विद्यार्थ्यांला अशा प्रकारे तुरुंगात डांबणे हे पवारांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, या शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.

त्या ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. असे असताना, एक तरुण विद्यार्थी एक महिन्यापासून अटकेत आहे. हे बरोबर नाही. असे करून तुम्ही देशात दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच (शरद पवार) एकप्रकारे प्रतिष्ठा कमी करत आहात, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनाही चपराक लगावली. त्याचवेळी आरोपी विद्यार्थ्याची तात्काळ जामिनावर सुटका करण्यास हरकत नसल्याचे निवेदन राज्य सरकारकडून न्यायालयात झाले, तरच राज्याची प्रतिष्ठाही कायम राहील, असे मत नोंदवून न्यायालयाने सरकार व पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देश दिले.

नेमके प्रकरण काय?
नाशिकमधील निखिल भामरे या औषधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांने पवारांविरोधात समाज माध्यमावरून आक्षेपार्ह ट्वीट केले होते. याप्रकरणी भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि भामरेला अटक करण्यात आली होती. १३ मे रोजी निखिलविरोधात पहिला एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर अनेकांच्या तक्रारींवरून त्याच्याविरोधात आणखी पाच पोलिस ठाण्यांत एफआयआर दाखल झाले. १४ मे रोजी अटक झाल्यानंतर निखिलला कनिष्ठ कोर्टांकडून जामीनही मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्याने सर्व एफआयआरच्या वैधतेलाच आव्हान देणारी फौजदारी रिट याचिका अ‍ॅड. सुभाष झा यांच्यामार्फत केली आहे.

या ट्विटमध्ये तर कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेखच नाही
या ट्विटमध्ये तर कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेखच नाही. तरीही तरुण विद्यार्थी एक महिन्यापासून अटकेत आहे. तुम्ही (पोलिस) अशाप्रकारे कारवाई करायला लागलात, तर नाहक देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच (शरद पवार) प्रतिष्ठा कमी होईल, असे खंडपीठाने वारंवार नमूद केले. तेव्हा, पवार यांचे नाव तर सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही चर्चेत आहे, असे झा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

अशा प्रकारची कारवाई योग्य नाही
सरकारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कदाचित पोलिसांकडून काय सुरू आहे याची कल्पना नसावी. दररोज हजारो ट्वीट होत असतात. अनावश्यक बदनामी करणाऱ्यांबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे बरोबर आहे. परंतु, अशाप्रकारे नव्हे. आरोपी तरुणाची पार्श्वभूमीही योग्य नाही, हे तपासात समोर आले आहे. हवे तर पोलिस तपासातील तपशील न्यायालयाने पाहावे, असा बचाव सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

नेमके ट्विट काय?
‘वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची…’ असे ट्विट निखिल भामरेने केले होते. त्यानंतर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्या तक्रारीवरून पहिला एफआयआर दाखल झाला. ‘या ट्विटमध्ये आमचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना बारामतीचा गांधी संबोधून त्यांना संपवण्याच्या आशयाची धमकी दिली आहे’, असे परांजपे यांच्या फिर्यादीत नमूद आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 14-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here