कोतळूक-कावणकरवाडी नदीवरील पुलाचे बांधकाम ३४ दिवसात पूर्ण

0

चिपळूण : लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या कोतळूक-कावणकरवाडी नदीवरील पुलाचे काम ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी अवघ्या ३४ दिवसात पूर्ण करून येथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

याबद्दल येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचे आभार मानले आहेत. कोतळूक- कावणकरवाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी साकव आहे. मात्र, या साकवावरून ये -जा करणे येथील ग्रामस्थांच्या दृष्टीने धोकादायक बनले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांनी नदीवर पूल व्हावा अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोतळूक – कावणकर वाडी येथील नदीवरील पुलासाठी निधी मंजूर झाला.

या पुलाच्या निविदेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या पुलाच्या उभारणीसाठी सुरुवात केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे, गुहागर विभाग उपअभियंता श्रीमती निकम, शाखा अभियंता श्री. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ३४ दिवसातच या पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पुलाची ४० मीटर लांबी असून रुंदी सव्वा आठ मीटर आहे. यावेळी येथील ग्रामस्थांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान मिळाले असल्याची माहिती ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी दिली. अल्पावधीतच या पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याने येथील गुहागरचे माजी सभापती विलास वाघे, शाखाप्रमुख प्रदीप कावणकर, कावणकरवाडी प्रमुख सीताराम कावणकर, बाधवरेवाडी वाडीप्रमुख तुकाराम बाथवरे, वाघेवाडी वाडी प्रमुख शंकर वाघे, उपविभागप्रमुख अंकुश शिगवण, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, कोतळूक तंटामुक्ती अध्यक्ष विजय बाधवरे, महिला अध्यक्ष स्वप्नाली कावणकर, बाधवरेवाडी महिला अध्यक्ष अवंतिका बाधवरे, कोतुळ पोलीस पाटील अनुजा वाघे, तंटामुक्ती सदस्य आनंद शिगवण, रामचंद्र जाधव बाधवरे, नरेश कावणकर, शांताराम कळंबटे, यशवंत कावणकर या सर्व ग्रामस्थांनी ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कोतळूक येथील ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक- सुरेश चिपळूणकर

रस्ते व पुलांच्या कामांसाठी अद्याप ठेकेदारांना देयके मिळाली नाही मात्र ठेकेदारांनी स्वबळावर रस्ते व पुलांची कामे केली आहेत. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये ही बाब लक्षात घेऊन ठेकेदारांनी अल्पावधितच रस्ते व पुलांची कामे पूर्ण केले आहेत. तरी शासनाने ठेकेदारांनी केलेल्या कामाची लवकरच बिले द्यावीत, अशी मागणी ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी केली. तसेच कोतळूक कावणकरवाडी येथील ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्य पूल उभारणीत महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 14-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here