राहुल गांधीच्या बचावासाठी आंदोलन म्हणजे काँग्रेसच्या विसर्जनाचा महोत्सव : आ. निरंजन डावखरे

0

ठाणे : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ निरंजन डावखरे यांनी केले आहे. भ्रष्टाचारास पाठीशी घालणाऱ्या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला असून भ्रष्टाचार आणि असत्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सत्याग्रहाचा मुलामा चढवून काँग्रेसने महात्मा गांधींच्या मूल्यांना मूठमाती दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आलेल्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राकरिता देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करून केवळ ५० लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुनावणीकरिता राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण करताच गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता सत्याग्रह आंदोलन सुरू करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे. भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून यासाठी देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही श्री डावखरे यांनी प्रसिद्धीसाठी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे. राष्ट्रीय भावनेतून स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आपल्या घामाचा पैसा ओतून उभारलेल्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचा गळा घोटून गांधी परिवाराने या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोलाने घशात घातल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी जामीनावर मोकळे असलेल्यांनी आपल्या बचावासाठी पक्षाला वेठीस धरून आंदोलन करण्याचा आदेश देत दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी सत्य जनतेसमोर आल्याने आता भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय कार्यासाठी उभारण्यात आलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीचे रियल इस्टेटच्या धंद्यात परिवर्तन करण्याचा गांधी परिवाराच्या भ्रष्ट कमाईचा डाव उघड झाला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे या प्रकरणातून वेशीवर टांगली गेली आहेत. केवळ गांधी परिवारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या काँग्रेसजनांना असत्य आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यातच अधिक रस असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेसने स्वतःच आपल्या विसर्जनाचा उत्सव सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. गांधी परिवारापुढे गुडघे टेकून देशाला वेठीस धरणाऱ्या ‘काँग्रेसका हाथ भ्रष्ट परिवार के साथ’ आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 15-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here